पैलवानांवरून आरोप-प्रत्यारोप; मोहोळांच्या टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2024 11:54 AM2024-03-24T11:54:02+5:302024-03-24T11:54:40+5:30
दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात शेकडो पैलवान उतरणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.
किरण शिंदे, पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्यानंतर आता प्रचाराला वेग आला. दोन्ही उमेदवारांकडून आता एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज शरद पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर धंगेकर आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली. मुरलीधर मोहोळ यांनी आजपर्यंत कोणकोणत्या बिल्डरांना दूध पाजलं हे देखील त्यांनी नाव घेऊन सांगून टाकलं. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा पलटवार केलाय. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर धंगेकर माध्यमांशी बोलत होते.
रवींद्र धंगेकर म्हणाले, आज होळी आहे वाईट प्रवृत्तींचा नाश होईल. आज सकाळीच आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचा सल्ला घेतला. सर्वच क्षेत्रात शरद पवार यांचे मोठे काम आहे. आगामी निवडणुकी संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेतलं. निवडणुकीचे नियोजन आणि पक्षांच्या सभा या संदर्भात शरद पवार यांच्याशी चर्चा केली. तसेच पुणे लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या सहा जाहीर सभा होणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात शेकडो पैलवान उतरणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते. इतकच नाही तर पैलवानांचा मेळावा देखील भरण्यात आला होता. यावर आता रवींद्र धंगेकर यांनी आपल्या खास स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. पैलवान हा कुणा एकाचा नसतो तर तो सर्वांचा असतो. समाजाच्या रक्षणासाठी पैलवान असतो. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा कधीच कुणाला बाधिल नसतो. तो फक्त त्याच्या आईवडिलांना बांधील असतो. मुरलीधर मोहोळ यांनी आज पर्यंत किती पैलवानांना दूध पाजलं ते त्यांनी सांगावे. मोहोळ यांनी आजपर्यंत व्यास गोखले यासारख्या बांधकाम व्यवसायिकांना दूध पाजलं. त्यांनी पैलवानांना अर्धा लिटरही दूध पाजले नाही. आणि जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहे असं म्हणत धंगेकर यांनी पलटवार केलाय.