Kasba By Elelction: दगडूशेठच्या उत्सव प्रमुखाचा पाठिंबा रवींद्र धंगेकरांना? अक्षय गोडसे गडबडले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 04:09 PM2023-02-23T16:09:44+5:302023-02-23T16:12:07+5:30
श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी हेमंत रासने येणार
पुणे : पुण्यात कसबा पोटनिडणुकीच प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरून अक्षय गोडसेने स्पष्टीकरण दिले आहे. कसब्याच्या पोटनिवडणुकीत माझा जाहीर पाठिंबा हेमंत रासने यांना असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी माणिक चव्हाण हे असून दोन वर्षांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने हे येणार आहेत. तर उत्सव प्रमुख प्रमुख अक्षय गोडसे हे आहेत. अशातच अक्षय गोडसे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर गणेश मंडळामध्ये चर्चेला सुरवात झाली. अक्षय गोडसे हे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे माजी अध्यक्ष दिवंगत अशोक गोडसे यांचे पुत्र असून तात्या गोडसे हे अक्षय याचे आजोबा आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उभारणीत गोडसे परिवारच एक मोठं योगदान असून अक्षय यांच्या या पाठिंब्याने गणेश मंडळाचे कार्यकर्त्यांमध्ये आत्ता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
महाविकास आघडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं आणि माझ्या परिवाराच गेल्या अनेक वर्षाच नात आहे. माझे आजोबा दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब गोडसे यांच्या पासून ते अशोक गोडसे आणि माझ्या पर्यंत त्यांचं अत्यंत स्नेहाच नातं आहे. तात्यासाहेब यांच्या प्रत्येक वाढदिवसाला धंगेकर हे तब्बल 1 हजार भगवत गिताचे पुस्तके त्यांच्या प्रभागात वाटत होते. गेली अनेक वर्ष त्यांचं आणि आमचं स्नेहाच संबंध आहे. आमच्या परिवाराचं त्यांना पाठबळ असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्यात आले होते.
माझा पाठिंबा हेमंत रासने यानांच
मी हेमंत रासने यांना पाठिंबा देणार आहे. रवी भाऊ आमचे व्यक्तिशः चांगले संबंध आहे. पण आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हंटलं नाही. रवींद्र धंगेकर मला सहज भेटायला आले होते. त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता मी हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा असल्याचा व्हिडिओ तयार करणार असल्याचे अक्षय गोडसे याने सांगितले आहे.