रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:57 PM2024-05-28T23:57:01+5:302024-05-29T01:27:36+5:30

रवींद्र धंगेकर यांनी भाजपवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे.

Ravindra Dhangekars Another Serious Allegation Against BJP | रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

Congress Ravindra Dhangekar ( Marathi News ) : पुण्यातील कल्याणीनगर इथं झालेल्या अपघातानंतर काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी सत्ताधारी महायुतीविरोधात आक्रमक भूमिका घेत अनेक गंभीर आरोप केले. अपघातावरून सुरू असलेली आरोपांची मालिका सुरू असतानाच धंगेकर यांनी भाजपवर आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. "एका कंपनीने भाजपला ९९६ कोटी रुपयांचा निवडणूक निधी दिला, त्या बदल्यात आपल्या पुण्याच्या रिंग रोडचे काम त्या कंपनीला दिले. पुणेकरांच्या टॅक्सरूपी पैश्यांची दिवसा ढवळ्या लूट केली आहे," असा हल्लाबोल धंगेकर यांनी केला आहे.

भाजपवर आरोप करत रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शहरात सुरू असलेल्या या सर्व गोंधळात तिकडे पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, MSRDC चे अधिकारी व ठेकेदार यांच्या लॉबीने इस्टीमेट रेट पेक्षा तब्बल ४० ते ४५  टक्के जास्त दराने निविदा भरल्याचे निदर्शनास आलं आहे. MSRDC सारख्या महामंडळाने याबाबत व्यवस्थित छाननी करून ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते. हेच ठेकेदार NHAI चे काम करत असताना यापेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने काम करतात.
यात आणखी एक गंभीर बाब अशी की, यातील मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला यातील ३ टप्प्यांचे काम मिळाले आहे, मेघा इंजिनियर ही भाजपला इलेक्टरोल बाँडच्या माध्यमातून निवडणूक निधी देणारी २ नंबरची कंपनी आहे. या कंपनीने भाजपला तब्बल ९९६ कोटींचा निवडणूक निधी दिलेला आहे. त्यामुळे चंदा दो-धंदा लो असाच काहीसा प्रकार आपल्या रिंग रोडच्या कामात देखील झाला आहे. तसेच रोड वे सोल्युशन या ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या कंपनीला देखील एका वर्षाच्या आत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पवित्र केले व आपल्या रिंग रोडचे काही काम त्यांना देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील जनतेचा व पुणे शहरातील नागरिकांचा कररुपी पैसा या ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून दिला जातो. कॉन्ट्रॅक्टची रक्कम ४० ते ४५ टक्क्यांनी वाढवली जाते आणि नंतर हेच जास्तीचे पैसे भारतीय जनता पार्टीला निवडणूक निधी म्हणून देण्यात येतात. रिंग रोडच्या कामाच्या निविदा प्रक्रियेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे," अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

दरम्यान, हे सर्व कागदपत्रे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे, कोणीही चौकशी करू शकता, असंही रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: Ravindra Dhangekars Another Serious Allegation Against BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.