संकेतस्थळ निर्मितीतून रवींद्र गुर्जर यांनी फोडला प्रचाराचा नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 03:53 PM2017-10-25T15:53:20+5:302017-10-25T16:02:03+5:30
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. रवींद्र गुर्जर यांनी स्वत:चे संकेतस्थळ तयार करून मंगळवारी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे.
पुणे : बडोदा येथे होणार्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत होणार असल्याने उमेदवारांनी प्रचारयंत्रणा कार्यान्वित करण्यास सुरूवात केली आहे. निवडणुकीतील पश्चिम महाराष्ट्रातील प्रबल उमेदवार राजन खान यांनी प्रचाराला बगल देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी रवींद्र गुर्जर यांनी स्वत:चे संकेतस्थळ तयार करून मंगळवारी प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात एखाद्या उमेदवाराने स्वत: चे संकेतस्थळ निर्मित करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे.
९१ व्या बडोदे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ज्येष्ठ लेखक आणि अनुवादक रवींद्र गुर्जर यांच्या संकेतस्थळाचे (www.ravdragurjr.com) उद्घाटन सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मसाप पिपंरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे. साहित्य सेतूचे प्रा. क्षितिज पाटुकले, मॉर्डन महाविद्यालयाच्या अॅनिमेशन विभागप्रमुख प्रा. समीर नेर्लेकर उपस्थित होते.
रवींद्र गुर्जर यांची संमेलानाच्या अध्यक्षपदामागची भूमिका आणि संमेलनानंतर कोणकोणते उपक्रम राबवणार आहेत, याची विस्तृत माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. त्यांचे मनोगत सांगणारा आणि मराठी स्वायत्त विद्यापीठ, बदलापूरचे संस्थापक श्याम जोशी यांचे विचार व्यक्त करणारा व्हिडिओ यामध्ये आहे. रवींद्र गुर्जर यांचा जीवन पट उलगडून दाखवताना त्यांच्या जीवनातील रोमहर्षक घटना आणि त्यांच्या पुस्तकांची माहिती संकेतस्थळामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. वाचकांना त्यांची पुस्तके संकेतस्थळावरुन खरेदी करता येतील.
या निमित्ताने रवींद्र गुर्जर यांनी ज्येष्ठ कादंबरीकार गुरूनाथ नाईक यांच्या औषधपचारासाठी रु. ११.०००/- चा धनादेश राजन लाखे यांच्याकडे प्रदान केला.