पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला रावेत पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:14 IST2024-12-09T11:14:18+5:302024-12-09T11:14:26+5:30

आरोपीने दारू पिऊन पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल केला, पोलीस तपासात माहिती समोर

Rawet Police caught the person who made the call about placing a bomb at Pune station, what exactly happened? | पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला रावेत पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं?

पुणे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करणाऱ्याला रावेत पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं?

पिंपरी : पुणे रेल्वे स्थानकावर रविवारी सकाळी बॉम्ब ठेवल्याचा पुणे शहर नियंत्रण कक्षाला फोन आला. त्यानंतर पुणे पोलिसांची धावपळ झाली. बॉम्ब शोधक - नाशक पथकाद्वारे तपासणी केली. तपासाअंती हा कॉल खोटा असल्याचे समोर आले. मोबाईल लोकेशनवरून तपास करीत एका तरुणाला रावेतपोलिसांनी अटक केली आहे. तो मद्यपी असल्याची माहिती समोर आली आहे.

रावेत पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, सागर उद्धव भंडारी (वय ४०, रा. किवळे गावठाण) असे त्या तरुणाचे नाव आहे. भंडारी हा रंगारी आहे. त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. वृद्ध आईसोबत तो किवळे येथे राहण्यास आहे.

नेमकं काय घडलं 

रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास भंडारी याने ११२ क्रमांकावर पुणे शहर पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल केला. पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनवर बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचे सांगितले. पुणे पोलिसांनी तत्काळ पावले उचलत बॉम्ब शोधक-नाशक पथकाला हा प्रकार कळविला. तसेच, कॉल आलेल्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन पाहिले असता ते किवळे येथील असल्याचे निष्पन्न झाले. पुणे पोलिसांनी त्वरित पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधला. रावेत पोलिसांचे एक पथक तातडीने लोकेशन दाखवत असलेल्या ठिकाणी रवाना झाले. पोलिसांनी संशयावरून भंडारीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने खोटा कॉल केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. भंडारी याच्यावर अफवा पसरविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही केली आहे. दरम्यान, बॉम्ब शोधक-नाशक पथकाने पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक दोनसह परिसराची कसून तपासणी केली. मात्र, त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

आरोपी भंडारी हा रंगारी असून त्याला दारूचे व्यसन आहे. त्याने दारू पिऊन पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा कॉल केला. पुणे पोलिसांनी माहिती देताचा रावेत पोलिसांचे एक पथक तयार करून त्याला अटक केली आहे. - नितीन फटांगरे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, रावेत पोलिस ठाणे

Web Title: Rawet Police caught the person who made the call about placing a bomb at Pune station, what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.