ससूनमधून एक आशेचा किरण आला,४२ वर्षी कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत होऊन घरी परतला...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 09:26 PM2020-04-16T21:26:56+5:302020-04-16T21:27:48+5:30
एकट्या ससूनमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३८ वर
पुणे : कोरोनाबाधित रुग्णांना ससून रुग्णालयात दाखल करण्यास सुरूवात झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पण गुरूवारी (दि. १६) ससूनमधून एक आशेचा किरण बाहेर आला आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेला एक ४२ वर्षी कोरोनाबाधित व्यक्ती उपचारानंतर ठणठणीत होऊन घरी परतला आहे.
ससून रुग्णालयातील मृतांमध्ये गुरूवारी चार आकड्यांची भर पडली. त्यामुळे एकट्या ससूनमधील मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ३८ वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनासह जिल्हा प्रशासनही पेचात पडले आहे. हा आकडा दररोज वाढतच चाललेला असल्याने विभागीय आयुक्तांनी अतिजोखमीच्या व्यक्तींवरील उपचार पध्दतीसाठी स्वतंत्र टास्क फोर्सचीही स्थापना केली आहे. आतापर्यंत रुग्णालयामध्ये ८० हून अधिक रुग्ण दाखल झालेले असताना त्यामध्ये जवळपास ३८ जणांचा मृत्यू झाल्याने ससूनकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही बदलला आहे. यापार्श्वभुमीवर गुरूवारी काहीसा दिलासा देणारी बातमी ससूनमधून आली आहे. कोरोनाबाधित झालेला एक रुग्ण उपचारानंतर सुखरुपपणे घरी परतला आहे. पर्वती येथील मित्रमंडळ कॉलनीतील ४२ वर्षी रुग्ण दि. ३१ मार्च रोजी ससूनमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. यात दिवसापासून ससूनमध्ये रुग्ण दाखल होण्यास सुरूवात झाली होती. या रुग्णा मध्ये दि. २६ मार्चपासून ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांपुर्वी १४ दिवसांचा कालावधी पुर्ण झाल्यानंंतर त्याची दोनवेळा पुन्हा चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये तो कोरोनामुक्त झाल्याचे आढळून आले. त्यामुळे त्याला रुग्णालायतून गुरूवारी घरी सोडण्यात आले. तसेच या रुग्णाला अन्य कोणताही आजार नव्हता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
--------
्रससूनमध्ये गुरूवारी दिवसभरात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. तर बुधवारी रात्री उशिरा एकाचा मृत्यू झाल्याने ससूनमधील मृतांचा आकडा ३८ वर तर जिल्हातील मृत्यू ४७ झाले आहेत. बुधवारी रात्री पर्वती येथील ३८ वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. तर गुरूवारी मृत्यू झालेल्या तिघांमध्ये एक ४७ वर्षीय महिला कोंढवा येथील दुसरी ५५ वर्षीय महिला गुलटेकडी येथील तर गंजपेठेतील ५४ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. या चौघांनाही इतर आजार होते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.