रयतमाऊलीचे कार्य समाजासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:09 AM2021-04-17T04:09:02+5:302021-04-17T04:09:02+5:30
बारामती : आपल्या असीम त्यागातून रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. त्यांचे ...
बारामती : आपल्या असीम त्यागातून रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी केली. त्यांचे कार्य समाजासमोर आले पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य अंकुश साळुंके यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी कर्मवीरांच्या व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शाहू हायस्कूलचे प्राचार्य अंकुश साळुंके, पर्यवेक्षक संजय ढवाण, गणपत तावरे आदी उपस्थित होते.
प्राचार्य साळुंके पुढे म्हणाले की, लक्ष्मीबाईंनी स्वातंत्र्यपूर्व काळात अठरापगड जातीधर्माच्या मुलांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळले. आपल्याजवळचे १२० तोळे सोने आणि आपले मंगळसूत्रसुध्दा गोरगरीब, पददलित मुलांच्या शिक्षणासाठी विकले. त्यांच्या त्यागानेच संस्थेची पायाभरणी झाली आणि आज या संस्थेचा वटवृक्ष झाल्याचे ते म्हणाले. या वेळी प्राचार्य साळुंके यांनी अनेक उदाहरणे देऊन लक्ष्मीबाई पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवला.
या वेळी गणपत तावरे, प्रा. अजय शिंदे यांनी कर्मवीरांच्या कार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनींनी ऑनलाइन भाषणे केली. प्रास्ताविक पर्यवेक्षक संजय ढवाण यांनी तर आभार रोहिणी टेके यांनी मानले. सूत्रसंचालन प्रियांका कदम यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात ऑनलाइन सहभाग घेतला.