सामूहिक हत्याकांडातील सात पैकी तिघांचे पुन्हा शवविच्छेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 06:53 PM2023-01-26T18:53:25+5:302023-01-26T18:53:31+5:30
दफन केलेली मृतांची शरीरे परत काढली बाहेर
यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सात पैकी तीन मृतदेहांचे आज परत शवविच्छेदन करण्यात आले. सात जणांच्या सामूहिक हत्याकांडामुळे पोलीस यंत्रणा यातील सर्व बाबी बारकाईने तपासत आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांची हत्या केली असल्याची प्रार्थमिक माहिती पोलीस तपासात समोर आली होती.
संपूर्ण कुटुंबच या हत्याकांडात मरण पावल्याने तसेच नातेवाईक गरीब असल्याने पोलिसांनी नातेवाईकांचे उपस्थितीत यवत येथे अंत्यविधी करत मृतांची शरीर दफन केली होती. मंगळवार दि 24 रोजी चार तर बुधवार दि. 25 रोजी तीन मृतांची शरीरे नवीन मुठा कालव्यालगत दफन करण्यात आली होती.
मृत्यू झालेल्या सात पैकी तिघांचे शवविच्छेदन यवत येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले होते. यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केलेल्या तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. आज पोलिसांनी दफन केलेल्या तीन व्यक्तींची शरीर बाहेर काढून तेथेच पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय टीम, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीत परत शवविच्छेदन करण्यात आले.
पाण्यातून सापडलेली मृत शरीरे कुजलेल्या अवस्थेत होती. यामुळे त्यांचा व्हिसेरा ठेवता आलेला नाही. यामुळे नेमका सात जणांचा खून केला तरी कसा? जर जिवंत असताना यांना पाण्यात टाकले तर त्यांना पोहता येत नव्हते का? आणि नेमकी घटना घडली तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत असून पोलीस तपासात कोणत्या बाबी समोर येतात हेही महत्त्वाचे आहे.
दैनिक लोकमत मधून मृतांच्या शवविच्छेदन अहवाल बाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांची प्रतिक्रिया छापण्यात आली. सदर प्रतिक्रियेत तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली होती. यामुळे सामूहिक हत्याकांड प्रकरणातील गूढ आणखीच वाढले आहे.