पूर्व हवेलीतील ‘त्या’ प्रस्तावित पोलीस ठाण्यांचा फेरविचार अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:14 AM2021-08-15T04:14:21+5:302021-08-15T04:14:21+5:30
पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलीस स्टेशन २३ मार्च २०२१ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय ...
पूर्व हवेली तालुक्यातील लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन्ही पोलीस स्टेशन २३ मार्च २०२१ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यालयात समाविष्ट झाली. तरी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमधून विभाजन करून उरुळी कांचन स्वतंत्र पोलीस स्टेशनचा प्रस्ताव गृह विभागात प्रलंबित आहे. पूर्व हवेली तालुक्याचे संपूर्ण कार्यक्षेत्र शहरात समाविष्ट झाले असले तरी, शहर पोलीस ठाण्यांचे एकूण क्षेत्रफळ, भौगोलिक रचना तसेच अत्यावश्यक सेवा अगदी ५ मिनिटांत पुरविणे अशक्यप्राय बनल्याने, पुणे आयुक्तालयातील समावेशाने काय साधले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पूर्व हवेली तालुक्यातील हा भाग ग्रामीण नाळेशी जोडलेला आहे. शेती, शेतीजोड उद्योगधंदे, अवजड वाहतूक या ठिकाणी अनिवार्य आहे. अशा स्थितीत या ठिकाणी शहरी निर्बंध लावणे नागरिकांना जुलमी व जिकिरीचे ठरू लागले आहे. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना सिटबेल्टपासून वाहन परवाना, वाहन पर्यावरण चाचणी अशा कायदा व नियमावर बोट दाखवून फक्त गल्ला भरू कारवाई सुरू असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आधीच कोरोनाने व्यवसायावर बंधने पडू लागली आहेत. या सर्व तक्रारींबद्दल खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी समन्वयातून मार्ग काढू न शकल्याने त्यांच्यावरही नागरिकांचा रोष वाढू लागला आहे.
शहर पोलीस व ग्रामीण पोलीस यांच्यातील जो फरक आहे, तो उरुळी कांचनसारख्या गावाने गेल्या चार महिन्यांपासून अनुभवला आहे. शहर पोलिसांमधील कोणत्याही तक्रारीची दखल न घेता अवैध धंदे बिनधास्त चालू ठेवण्यासाठी पाठबळ देण्याची पद्धत अनुभवलेली आहे. यामुळे या भागातील जनतेची भावना ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात राहण्याचीच झालेली आहे, हे वास्तव नाकारता येत नाही.