तक्रारीमध्ये तथ्य असलेल्या विद्यार्थ्यांचीच फेरपरीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:27+5:302021-07-02T04:09:27+5:30
पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित, बॅकलॉग व बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १२ जुलैपासून सुरू ...
पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नियमित, बॅकलॉग व बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या १२ जुलैपासून सुरू होत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक टप्प्याटप्प्याने संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. या परीक्षा ऑनलाइन होत असून, त्याची मार्गदर्शक तत्त्वे व सूचना विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने प्रसिद्ध केल्या आहेत.
ऑनलाइन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी उद्भवल्यास त्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लॉगीनवरून तक्रारी करता येईल. विद्यार्थ्यांना परीक्षा देत असताना लॉगीन न होणे, अचानक लॉगआऊट होणे व पुन्हा लॉगीन न करता येणे, तसेच इंग्रजी अथवा मराठी माध्यम प्रश्नपत्रिका उपलब्ध न होणे, आकृत्या न दिसणे, चुकीच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध होणे, पेपर सबनीट न होणे, विद्यार्थ्यास परीक्षेच्या वेळी कोरोनाची बाधा होणे, दोन विषयाच्या परीक्षा एकाच दिवशी व एकाच वेळी येणे आदी तांत्रिक अडचणी येऊ शकतात.
‘स्टुडंट प्रोफाइल सिस्टिम’मधून योग्य कारण व पुराव्यासह दाखल केलेल्या तक्रार अर्जाची छाननी करून सत्यता पडताळली जाणार आहे. त्यानंतर तक्रारीमध्ये तथ्य असल्यास संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईल. ज्यांनी तक्रार दाखल केली आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेतली जाईलच असे नाही, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे.
.............
परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जात असल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे योग्य पर्याय निवडणे आवश्यक आहे. पर्यायाचे बटण न दाबता त्यासमोरील टेक्स्ट किंवा आकृतीवर क्लिक केल्यास विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पर्यायाची नोंद होत नाही. त्यामुळे उत्तरपत्रिका सबमिट करण्यापूर्वी सर्व प्रश्नांची उत्तरे नोंदवली गेल्याची खात्री करावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांनी केले आहे.
-------