‘जय जय गौरी शंकर’ चा अर्धशतकानंतर पुन्हा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:04+5:302021-01-01T04:08:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : चौपन्न वर्षांपूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट १९६६ या रविवारच्या सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चौपन्न वर्षांपूर्वी म्हणजे १४ ऑगस्ट १९६६ या रविवारच्या सकाळी ९, दुपारी ३ आणि रात्री ८.३० वाजता एक नाटक रंगमंचावर सादर झालं ‘संगीत जय जय गौरी शंकर’. ‘ललितकलादर्शन’ची ही कलाकृती अजरामर ठरली. या नाटकाचे निर्माते नाट्यतपस्वी भालचंद्र ऊर्फ अण्णा पेंढारकर यांचे जन्मशताब्दी वर्ष, ‘ललितकलादर्श’चा स्थापना दिन (१ जानेवारी १९०८) आणि नाटकाचे लेखक विद्याधर गोखले यांचा जन्मदिन (४ जानेवारी) असा योग जुळवत हेच नाटक यंदा पुन्हा सादर होणार आहे.
‘जय जय गौरी शंकर’ या नाटकाचे चित्रीकरण ८० च्या दशकात झाले होते. त्या मूळ संचातील नाटकाच्या संपूर्ण तीन अंकांचे चित्रण यू-ट्यूबच्या माध्यमातून रसिकांसमोर आणले जाणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करीत येत्या रविवारी (दि. ३) नाटकाचे तीन प्रयोग होणार असून, पहिला अंक सकाळी ९ ला, दुसरा दुपारी ३ ला आणि तिसरा अंक संध्याकाळी ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.
गोव्याच्या मंगेशीच्या देवळात १९६६ साली सहा वर्षांच्या ज्ञानेश पेंढारकरच्या हस्ते ‘जय जय गौरीशंकर’ या नाटकाचा मुहूर्त झाला होता. पं. राम मराठे, भालचंद्र पेंढारकर, प्रसाद सावकार, जयश्री शेजवाडकर यांसह आणखी तीन सहकलाकारांच्या सोबत ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले लिखित या नाटकाच्या तालमींना सुरुवात झाली. नाटकाचे दिग्दर्शक होते, नटवर्य मामा पेंडसे तर संगीत दिग्दर्शक होते ख्यातनाम संगीतकार वसंत देसाई.
तीन-चार महिन्यांच्या तालमीनंतर १४ ऑगस्ट १९६६ रोजी ‘जय जय गौरीशंकर’चा पहिला प्रयोग भालचंद्र पेंढारकरांच्या संस्थेने बिर्ला मातोश्री सभागृहात झाला. त्या काळी या नाटकाचे सुमारे अडीच हजार प्रयोग झाले. हाही संगीत रंगभूमीवरचा एक विक्रमच ठरला. सध्या हे नाटक आर्यदुर्गा क्रिएशन मुंबईतर्फे सादर केले जात आहे.