Positive Story: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर 'रिव्हर्सल ऑपरेशन'ने पुन्हा मातृत्व, माहितीसाठी वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:12 AM2024-05-17T09:12:08+5:302024-05-17T09:13:34+5:30
अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो....
- प्रकाश गायकर
पिंपरी : 'छोटे कुटुंब, सुखी कुटुंब' याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यामुळे दोन किंवा एक मूल झाल्यानंतर अनेकजण कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करतात. अशा सुखी कुटुंबातील मूल काही कारणांनी मृत झाल्यास कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. मात्र, महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झाली असतानाही 'फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी ने पुन्हा मुलाला जन्माला घालता येते, या सर्जरीकडे महिलांचा कल वाढला आहे.
अनेक दाम्पत्ये एका मुलावर कुटुंच नियोजन शस्त्रक्रिया करतात. मात्र काही वेळा वेगवेगळ्या कारणांनी मुलाचा मृत्यू होतो. त्यात आजारपण, अपघात, सर्पदंश अशा कारणांचा समावेश असतो. एकुलता एक मुलगा गेल्यानंतर कुटुंबावर मोठा आघात होतो. मात्र, आता अशा घटनानंतर फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी करून मुलाला जन्म देण्याकडे दाम्पत्यांचा कल वाढला आहे.
शस्त्रक्रियेविषयी अनेकजण अनभिज्ञ
कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिलेला पुन्हा अपत्य हवे असेल तर 'ट्यूबल रिकॅनलायजेशन किंवा फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरी केली जाते. मात्र, अनेकांना याविषयी माहिती नसते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेमध्ये फैलोपियन ट्यूब कापली जाते. मात्र या प्रक्रियेत ती पुन्हा जोडली जाते. त्यामुळे पुन्हा गर्भधारणा होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातही अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.
'सक्सेस रेट' चांगला
शहरामध्ये वर्षभरात १५ ते २० या शस्त्रक्रिया होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अपत्याचा मृत्यू झाल्यानंतर अनेकजण या शस्त्रक्रियेचा पर्याय स्वीकारतात. त्याचा सक्सेस रेट' ही चांगला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
'रिव्हर्सल ऑपरेशन' कधी?
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या दाम्पत्याने मूल गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मूल हवे असल्यास.
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या महिलेच्या पतीचा मृत्यू अथवा घटस्फोट झाल्यावर त्या महिलेला पुन्हा विवाह करायचा असल्यास.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर अपत्याचा मृत्यू झाल्यास फॅमिली प्लॅनिंग रिव्हर्सल सर्जरीचा पर्याय आहे. अद्याप याबाबत समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. अनेकांना ही अशी शस्त्रक्रिया करून पुन्हा मुलाला जन्म देता येतो, याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपत्य गमावल्यानंतर अनेकजण शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, मुलाला काळाने हिरावून घेतलेल्या महिलांना यामुळे पुन्हा मातृत्व मिळते.
- डॉ. शिवाजी ढगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय,