खडकवासला धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; प्रशासनाने पुणेकरांना केलं 'हे' आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:34 PM2024-07-28T23:34:36+5:302024-07-28T23:34:56+5:30
धरण साखळीत २५ टीएमसी पाणीसाठा : पुणेकरांची तहान भागली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात चांगला पाऊस होत असून, धरणसाठादेखील वाढला आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या धरण साखळीत रविवारी (दि. २८) तब्बल २४.९५ टीएमसी पाणीसाठा झाला. त्यामुळे खडकवासला धरणातून पाच हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.
चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेर दमदार पाऊस होत आहे. त्यामुळे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. तसेच ग्रामीण भागाला शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे चारही धरणे भरली असून, धरणांतून विसर्ग केला जात आहे. खडकवासला धरण साखळीची पाणीसाठा क्षमता २९ टीएमसी आहे. आतापर्यंत २४.९५ टीएमसी साठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.
जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पण जुलैच्या मध्यानंतर दमदार पाऊस झाला आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठा होऊ लागला. गेल्या चार-पाच दिवसांपासून धरण परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे खडकवासला धरण साखळीत चांगला पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून पहिल्यांदाच रविवारी दुपारी १ वाजता ४,७१२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला.
धरणांच्या परिसरात संततधार कायम असून, रविवारी खडकवासलामधून पुन्हा विसर्ग सोडण्यात आला. धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त केला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
प्रशासनाने काय आवाहन केलंय?
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवून आज रात्री १२.०० वा. १३ हजार ९८१ क्यूसेक करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये - उपविभागीय अभियंता, मुठा कालवा पाटबंधारे उपविभाग
विसर्ग वाढवला !
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये सुरू असणारा ५१३६ क्युसेक विसर्ग वाढवून २८ जुलै रोजी रात्री ८ वाजता ७७०४ क्युसेक करण्यात आला. पानशेत धरणातूनदेखील रविवारी दुपारी ४७१२ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला.
धरण साठा
खडकवासला : १.६१ टीएमसी : ८१.४३ टक्के
पानशेत : १०.१६ टीमसी : ९५.४५ टक्के
वरसगाव : १०.२९ टीएमसी : ८०.२५ टक्के
टेमघर : २.८९ टीएमसी : ७७.९९ टक्के
एकूण : २४.९५ टीएमसी : ८५.५९ टक्के