कोंढरीच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव पुन्हा सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:10 AM2021-07-25T04:10:24+5:302021-07-25T04:10:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोर : कोंढरी (ता. भोर) गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव नव्याने सादर करा. पुनर्वसनासाठी योग्य तो पाठपुरावा करुन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोर : कोंढरी (ता. भोर) गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव नव्याने सादर करा. पुनर्वसनासाठी योग्य तो पाठपुरावा करुन नागरिकांचे लवकरात लवकर स्थलांतरण केले जातील, असे आश्वासन कोंढरी ग्रामस्थांना जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे भोर तालुक्यातील महाड भोर रस्त्यावरील कोंढरी, हिर्डोशी, वारवंड, शिरगाव, वरंध घाटात नुकसान झालेल्या भागाची पाहणी जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी केली. त्या वेळी त्यांनी कोंढरी गावात दोन वर्षांपूर्वी पावसामुळे डोंगरातून दरड पडलेल्या भागाची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधला. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे, भिवबा पारठे जिजाबा पारठे, शंकर पारठे, संदीप पारठे, बापु पारठे, मारुती कोंढाळकर, मारुती कालवाणकर, प्रवीण पारठे, विलास मादगुडे उपस्थित होते.
कोंढरी गावात भूस्खलन झालेल्या डोंगराची पाहणी सर्व अधिकाऱ्यांनी केली. कोंढरी गाव नीरा देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेले होते. त्यावेळीही त्यांचे पुनर्वसन रखडले होते. नवीन पुनर्वसन होत नाही, मात्र नव्याने कोंढरी गावाचे पुनर्वसनाचा प्रस्ताव सादर करा. पुनर्वसनासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार देशमुख यांनी या वेळी दिले. त्यानंतर भोर महाड रस्त्यावरील पावसामुळे दरडी पडुन रस्ता बंद झालेल्या हिर्डोशी, वारवंड, शिरगाव व वरंध घाटातील रस्त्याची त्यांनी पाहणी केली. लवकरात लवकर रस्त्यावरील दरडी साफ करुन रस्ता वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट
पहिले पुनर्वसन करा, तरच बाहेर जाऊ
सन २०१९ साली कोंढरी गावातील भुस्खलन होऊन डोंगरच खाली आला होता. त्यावेळी धोकादायक झाल्याने गावातील लोकांचे जिल्हा परिषद शाळेत तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले होते. त्यावेळी पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे, खासदार आमदार सर्वांनी भेटी देऊन पुनर्वसना करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन वर्षांत ना पुनर्वसना झाले ना ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हालविण्यात आले. यावेळी सर्वत्र भूस्खलन होऊन डोंगर खाली येत असल्याने येथील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरु केल्या आहेत. दरवेळी पावसाळा आला की प्रशासनाला येथील लोकांची आठवण होते. पावसाळा संपला की येथील प्रश्नांना बगल दिली जाते. यामुळे आधी आमचे पुनर्वसना करा तरच आम्ही गावाबाहेर पडू आमच्या जिवाशी खेळू नका, अशा संतप्त भावना येथील नागरिकांनी व्यक्त केली.
फोटो : कोंढरी गावाची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे व इतर मान्यवर.