नगरपरिषद हद्दीत सुरू असलेल्या कामाची फेरनिविदा काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:20 AM2021-03-13T04:20:13+5:302021-03-13T04:20:13+5:30
दरम्यान, याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यावेळी, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, ...
दरम्यान, याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. यावेळी, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, गटनेते कैलास कदम, दूधगंगाचे चेअरमन मंगेश पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, पांडुरंग शिंदे, सागर गानबोटे, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे, गुड्डू मोमीन हर्षवर्धन कांबळे आदी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, इंदापूर शहरातील विकासकामांबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केलेला आराखडा, प्रत्यक्ष मापे, कागदोपत्री निविदा व प्रत्यक्ष विकासकामे यामध्ये ४० टक्के तफावत आढळत आहे. या सुरु असलेल्या कामांमध्ये अंडरग्राऊंड सांडपाण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याने भविष्यात पुन्हा तयार केले काँक्रिटीकरण व रस्ते उकरावे लागणार असल्याने वेळेचा तसेच पैशाचाही अपव्यय होणार आहे. वाढीव कामाची निघणारी रक्कम याचा लाभ नक्की कोणाला होणार आहे ? याचा जाब द्यावा. सदर चुकीच्या निविदा रद्द करुन फेर निविदा काढाव्यात अन्यथा इंदापूर तालुका भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आलेला आहे.
आमचा कोणत्याही विकासकामास विरोध नाही. परंतु आपण काढलेले टेंडर हे राजकीय दबावापोटी काढल्याचे जाणवत आहे. अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांच्या दबावाला बळी न पडता वाढीव मापे देणाऱ्या भ्रष्ट कारभाऱ्यांची नावे जाहीर करावीत. तसेच चुकीचे इस्टिमेट सादर करणा-या इंजिनिअरवर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
बहुजन मुक्ती पार्टीने केले होते फिल्ड सर्वेक्षण
बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन मुक्ती पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते संजय (डोनाल्ड) शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांनी केलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी जावून, प्रत्यक्ष कागदावर असलेले बांधकाम व कामाच्या ठिकाणी असलेले बांधकाम यांचे मोजमाप पट्टी लावून मोजणी केली होती. त्यांनी दिलेले काम आणि केलेले काम या कामात चाळीस टक्के फरक पडतोय, असे सांगितले होते.
१२ इंदापूर नगरपरिषद
इंदापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देताना भाजपाचे कार्यकर्ते.