पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोची पुन्हा चाचणी; पुणे पिछाडीवरच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 11:27 AM2020-08-07T11:27:17+5:302020-08-07T11:27:49+5:30
पिंपरी चिंचवडच्या प्राधान्य मार्गाचे काम पुढे गेले व पुण्यातील काम मात्र मागे पडले आहे.
पुणे: पिंपरी- चिंचवडमध्ये पिंपरी ते फूगेवाडी दरम्यान मेट्रोची पुन्हा चाचणी घेण्यात येत आहे. तेथील संत तुकाराम नगर व फुगेवाडी या दोन स्थानकांचे कामही बरेचसे पुर्ण झाले असून त्या तुलनेत वनाज ते गरवारे महाविद्यालय हा पुण्यातील प्राधान्य मार्ग मात्र मागे पडला आहे.
यापूर्वी एकदा पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोची चाचणी झाली आहे. आता परत एकदा चाचणी घेण्यात येणार आहे. दोन कोच असलेली मेट्रो पिंपरी ते फुगेवाडी या ५ किलोमीटरच्या अंतरावर चालवून पाहिली जाईल. मेट्रोने हा प्राधान्य मार्ग जाहीर केला होता. या मार्गावर असलेल्या संत तुकाराम नगर व फुगेवाडी या दोन स्थानकांचे कामही गतीने करण्यात येत आहे.प्लँटफॉर्म, छत अशी कामे झाली आहेत. त्यामुळे येत्या एकदोन दिवसात या मार्गावर पुन्हा चाचणी होत आहे.
पुण्यात वनाज ते गरवारे महाविद्यालय या प्राधान्य मार्गाचे काम मात्र अद्याप बरेच मागे आहे. हाही मार्ग ५ किलोमीटरचाच आहे. या मार्गावर नळस्टॉप चौकापासून दोन्ही बाजूंना मेट्रोच्या खांबांच्या मध्यभागापासून एक उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. महापालिका त्याचा खर्च करणार आहे. तो निधी मिळाल्यानंतरही हे काम गती घ्यायला तयार नाही. या रस्त्यावर असलेली वाहतूक कामात अडथळा ठरत आहे. त्याशिवाय पौड रस्त्यावरून एसएनडीटी कडे येताना मेट्रोला एक मोठे वळण आहे. त्याच्याही खाबांचे काम अजून बाकी आहे. वनाज, आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय या स्थानकांचे काम सुरू असले तरी त्यालाही विशेष गती नाही. त्यामुळेच हा प्राधान्य मार्ग मागे पडला असल्याचे दिसते आहे.
कोरोना टाळेबंदीच्या आधीच्या मेट्रोच्या वेळापत्रकात दोन्ही प्राधान्य मार्गाच्या चाचण्या घेण्याचे नियोजन होते. टाळेबंदीने सगळेच वेळापत्रक कोलमडले. तरीही पिंपरी चिंचवडच्या प्राधान्य मार्गाचे काम पुढे गेले व पुण्यातील काम मात्र मागे पडले आहे.
---///
गती वाढवण्याचा प्रयत्न
दोन्ही मार्गांवरच्या कामांना आम्ही महत्व देत आहोत. कोरोनात गावी गेलेले मजूर, काम बंदी व वाहतूक वगैरे सारखे अडथळे येत गेल्याने कामाची गती कमी झाली. पण ती भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुण्यातील प्राधान्य मार्गाचे कामही लवकरच पुर्ण होईल
अतूल गाडगीळ, संचालक ( प्रकल्प) महामेट्रो.
----//
चाचणी म्हणजे सुरूवात नाही
चाचणी म्हणजे मेट्रो सुरू होणार असे नाही. कमीशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी यांच्याकडून मेट्रो मार्गाचे परीक्षण होते. ते सर्व गोष्टींची पाहणी करतात. सुरूवातीचे वर्ष वेगही किती असावा ते निश्चित करून देत असतात. या सर्व प्रक्रियेला वेळ लागतो. काम गतीने व्हावे असाच आमचा प्रयत्न आहे.
हेमंत सोनवणे, सरव्यवस्थापक, महामेट्रो.
---//