बेल्ह्यात चंदनाच्या झाडांची पुन्हा चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:11 AM2021-05-20T04:11:48+5:302021-05-20T04:11:48+5:30
चोरीची घटना घडली त्याच परिसरात राहत असलेले रामदास पाबळे म्हणाले की, या परिसरात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार वारंवार घडत ...
चोरीची घटना घडली त्याच परिसरात राहत असलेले रामदास पाबळे म्हणाले की, या परिसरात चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार वारंवार घडत असून, यामागे चोरट्यांची एखादी टोळी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चंदनाच्या झाडाला बाजारात चांगली मागणी असल्याने चोरट्यांनी अशी झाडे कापून चोरी करण्याकडे लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत असून, परिसरात अधूनमधून पण वारंवार चंदन चोरीचे प्रकार घडत असतात. चंदनाची झाडे तोडण्यावर सर्वसामान्य लोकांना शासकीय बंदी असली तरी चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने हे प्रकार वाढत आहेत. त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात येत आहे असे दिसते. ज्या ठिकाणी चंदनाची झाडे आहेत तेथे दिवसा चंंदन चोरट्यांकडून पाहणी केली जाते व चंदनाच्या झाडाला छेद पाडून गाभ्यातील चंदनाचा सुगंध येत असल्यास संधी साधून रात्रीच्या वेळी ही झाडे कापून नेली जातात. तसाच प्रकार या परिसरात वारंवार घडत आहे. रात्री-अपरात्री संशयास्पदरित्या फिरणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. पोलिसांनी चंदन चोरांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
--
फोटो क्रमांक : १९बेल्हा चंदन झाड
फोटो क्रमांक : बेल्हा (ता. जुन्नर) येथे चंदनाच्या झाडांची अशी कत्तल करून चोरी होत आहे.