जिल्हा परिषदेत दिव्यांगांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:13 AM2021-09-23T04:13:26+5:302021-09-23T04:13:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी केली जात आहे. मात्र, त्यासाठी अनेक कर्मचारी टाळाटाळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी केली जात आहे. मात्र, त्यासाठी अनेक कर्मचारी टाळाटाळ करत आहेत. आता ५ ऑक्टोबरपर्यंत खाते प्रमुखांकडे फेरपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सादर केलेले प्रमाणपत्र अवैध घोषित केले जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे.
दिव्यांग असल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर करुन नोकरी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर दिव्यांग कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांमार्फत फेरपडताळणी केली जात आहे. मात्र, अनेक कर्मचारी ससून रुग्णालयात जात नाहीत. यासंदर्भात ससून रुग्णालय प्रशासनाने स्मरणपत्रही पाठविली आहेत. आता याविषयी जिल्हा परिषद प्रशासन कठोर भूमिका घेत असून, आता कर्मचाऱ्यांनी ५ ऑक्टोबरपर्यंत फेरपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यास सादर केलेले प्रमाणपत्र अवैध मानले जाईल. तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ अन्वये शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा दिला आहे.