‘आमचे म्हणणे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:09+5:302021-09-17T04:14:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आमच्या देशाबरोबर, आमच्या पालकांबरोबर आमचा संवाद तुटला आहे. आम्हाला आर्थिक मदत, व्हिसाची मुदतवाढ हवी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “आमच्या देशाबरोबर, आमच्या पालकांबरोबर आमचा संवाद तुटला आहे. आम्हाला आर्थिक मदत, व्हिसाची मुदतवाढ हवी आहे. आमचे हे म्हणणे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवा,” अशी हाक पुण्यातील अफगाणी विद्यार्थ्यांनी दिली.
गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल यांनी पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या व इथेच अडकून पडलेल्या अफगाणी विद्यार्थ्यांबरोबर गुरुवारी (दि. १६) दुपारी गांधी भवनात संवाद साधला. पन्नास विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
दिलावर म्हणाला की, शिक्षण, विकास यात भारताने अफगाणीस्तानला कायम मदत केली आहे. आम्ही अडचणीतून पुढे जात आहोत. व्हिसा एक्सटेंशन, शिष्यवृत्ती या आमच्या तातडीच्या गरजा आहेत. शहाबुद्दीन यानेही भारत व आमच्या देशाचे संबध वाढावेत अशीच आमची इच्छा असल्याचे सांगितले. मंझूर याने सरकारने रोजगाराची संधी द्यावी, कष्ट करून आम्ही शिक्षण पुढे सुरू ठेवू इच्छितो असे सांगितले.
स्मारक निधीचे अध्यक्ष कुमार सप्तर्षी, पत्रकार निरंजन टकले यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. युक्रांदचे राज्य संघटक जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. युक्रांदचे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, रोहन गायकवाड, आदित्य आरेकर, संजय सोनटक्के, गोरख भालेकर, ललीत मुथा आदी उपस्थित होते.