सेंद्रिय शेतीचा देशी ब्रँड पोहचवला आंतराष्ट्रीय स्तरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:07+5:302021-06-11T04:08:07+5:30
निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेतीमध्ये उत्पन्न नसल्याने मुलांनी चांगले शिकुन मोठे व्हावे यासाठी वडिलांनी लहानपणापासून बोर्डींग ...
निनाद देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेतीमध्ये उत्पन्न नसल्याने मुलांनी चांगले शिकुन मोठे व्हावे यासाठी वडिलांनी लहानपणापासून बोर्डींग स्कूलमध्ये घातले. या शिक्षणाच्या जोरावर बहुराष्ट्रीय बँकेत तसेच कॉप्रोरेट क्षेत्रात नोकरीही मिळवली. मात्र, लहानपणापासून असलेली शेतीची आवड शांत बसू देत नव्हती. अखेर आपली आवड जपण्यासाठी गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडत पुन्हा गावी येत सेंद्रीय शेतीची कास धरली. शेतीचा गंध नसतांनाही वाचन अभ्यासातून विषमुक्त शेती केली. नुसतीच शेती नाही तर दोन भावांच्या मेहनीची साक्ष देणारा ‘टु ब्रदर ऑरगॅनिक फार्म’ हा ब्रँाड तयार केला. आज हा ब्रँड जवळपास ४५ देशातील ६६० शहरात पोहचला आहे. स्वप्नवत वाटणारी ही कामगिरी पुणे जिल्ह्यातील इंदापुर तालुक्यातील भोडणी येथील सत्यजित आणि अजिंक्य हांगे या दोन भावांनी साक्षात उतरवली आहे.
सत्यजित आणि अजिंक्य हे वयाच्या चार वर्षांपासून बोर्डीग स्कूल मध्ये शिकले.शेतीत पूर्वी सारखा फायदा नसल्याने मुलांना शेती करावी लागू नये अशी त्यांच्या वडिलांची अपेक्षा होती. सत्यजित आणि अजिंक्य लहानपणापासूनच अभ्यासून आणि चिकित्सक होते. सत्यजितने अर्थशास्त्र विषयातून फर्ग्यूसन महाविद्यालयातून पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पुंबा येथून एमबीए पूर्ण केले. भावाच्या पावलावर पाय ठेऊन अजिंक्यनेही आपले शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर सीटी बँक सारख्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या बँकेत नोकरी मिळवली. मात्र, त्यांचे मन या क्षेत्रात रमले नाही. वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय बॅंकेमध्ये अनुक्रमे १० आणि ४ वर्षे नोकरी केल्यानंतर हांगे बंधूंनी २०११ मध्ये नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला. वडिलोपार्जित ३२ एकर शेतीपैकी २१ एकर शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली. वर्षानूवर्षे शेती केल्याने जमिनीची पोत घसरली होती. यामुळे त्यांनी पारंपारिक पद्धतीने शेतीचे नियोजन केले. शेतीची माहिती नसल्याने तसेच शिक्षण नसल्याने त्यांनी वाचन, अभ्यास करत सेंद्रीय शेतीचा निर्णय घेतला. या साठी जिल्ह्यातील, राज्यातील एवढेच नव्हे तर देशातील या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या तसेच शेतकऱ्यांच्या भेटी आणि विचार जाणुन घेतले. प्रत्यक्ष शेतीचा अनूभव त्यांनी घेतला. त्या जोरावर सुरवातीला पपईचे उत्पादन घेतले. त्या विक्रीसाठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे आणल्या. चांगला माल असूनही केवळ त्यांना ४ रूपये किलोला भाव मिळाला. दलाल, आडते पद्धतीमुळे चांगला माल असूनही आपल्या मालाला चांगला भाव मिळणार नाही हे हांगे बंधूना कळून चुकले. यामुळे आपणच ग्राहकांपर्यंत माल पोहचवा असे त्यांनी ठरवले. या साठी चक्क थेट हातगाडे विक्रेत्यांना गाठले. त्यांच्या माध्यमातून चांगला माल थेट ग्राहकांपर्यंत पाेहचवला. यातून थेट नफा मिळवला. हा यशस्वी प्रवास त्यांचा सुरूच राहिला. मॉलमध्ये विक्रिसाठी सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र त्यांना हवे होते. ते त्यांनी मिळवले. यानंतर पुण्यातील मॉल येथेही त्यांनी त्यांच्या मालाची विक्री सुरू केली. मात्र, येथेही नफेखोरी होत असल्याने आपला माल आपणच थेट ग्राकहांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी स्वत:ची वितरण व्यवस्था निर्माण केली. आज राज्यातूनच नव्हे तर देशातून आणि परदेशातून त्यांच्या मालाला मोठी मागणी आहे.
चौकट
सोशल मिडीयातून मिळवली माहिती
सुरवातीला त्यांनी पारंपरिक पद्धतीने शेतीचे नियोजन केले. सातत्याने वाचन, अभ्यास यातून सेंद्रिय शेतीला सुरवात केली. उसाचे क्षेत्र कमी करत डाळिंब, देशी पपई, लिंबू, केळी या फळबागांसोबतच देशी तूर, शेवगा, खपली गहू, हरभरा, मूग, उडीद, चवळी ही हंगामी आंतरपिके घेतली. शेतीमध्ये विनामशागत तंत्र, मिश्र शेती व फूड फॉरेस्ट या संकल्पना राबवल्या. या साठी त्यांनी सोशल मिडीयाचाही वापर केला. त्यातून माहिती घेत ते प्रयोग प्रत्यक्ष शेतीत राबविले. याच प्रयोगांचा आज ‘टू ब्रदर अॅरगॅनिक फार्म’च्या रूपात वटवृक्ष झाला आहे.
व्यवस्थापन क्षेत्राच्या अनुभावाची शेतीला दिली जोड
पारंपारिक पद्धतीने त्यांनी शेतीला सुरवात केली. सेंद्रीय शेतीमुळे दर्जेदार उत्पादन निघाले. मात्र, मार्केटयार्डात त्यांना योग्य भाव मिळाला नाही. या प्रमाणे शेती केली तरती कधीच आपल्याला फायद्याची ठरणार नाही हे हांगे बंधूना कळाले. शहारात असल्यामुळे त्यांना मॉलसंकल्पना माहिती होती. मात्र, त्यांच्याकडे सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र नव्हते. माल विकायचा कसा हा प्रश्न असतांना त्यांच्या व्यवस्थापन क्षेत्राचा अनुभव कामी आला. हडपसर येथे हातगाडीवरील विक्रेत्यांशी संपर्क साधला. काही फळे चवीसाठी मोफत देत ग्राहकांना आकर्षित करण्याचे धोरण आखले. यातून ग्राहकांना मालाची खात्री मिळाल्याने विक्री वाढली. दर्जेदार मालासाठी हांगे यांच्या फार्मची ओळख निर्माण होण्यास मदत झाली. ती टिकवून ठेवण्यासाठी ग्रेडिंग आणि पॅकिंगवर भर दिला. सेंद्रीय शेतीचे प्रमाणपत्र मिळाल्यावर स्टारबझार, गोदरेज, रिलायन्स यामालमध्येही मालाची विक्री सुरू केली. यामुळे ग्राहकांना नेमके काय हवे आहे हे हेरून त्या पद्धतीचा माल त्यांनी द्यायला सुरू केले. चांगला माल असला की लोक चांगली किंमत देतात हे त्यांनी हेरले आणि त्या दृष्टीने मालाचा पुरवठा व विक्री करण्यास सुरुवात केली. या सोबतच पुणे, बेंगरूळू, गोवा, मुंबई, दिल्ली येथील सेद्रीय उत्पादनाची दुकाने हेरून तेथूनही त्यांच्या मालाची विक्री केली.
चौकट
ऑनलाईन मार्केट व वितरण व्यवस्थेची उभारणी
सेंद्रीय उत्पादनांना जगात मागनी आहे. हे हेरून तो माल आंतराष्ट्रीय स्तरावर नेण्याासाठी ‘टु ब्रदर’ चे ब्रँडीग त्यांनी सुरू केले. या साठी फेसबुक, यु ट्यूब, इंस्टग्रामचा वापर केला. या सोबतच टुब्रदररईंडीया.कॉम नावाचे संकेतस्थळही तयार केले. या द्वारे फ्लीपकार्ट, अॅमेझॉन सारखी स्वत:ची वितरण व्यवस्था निर्माण केली. आज या वितरण व्यवस्थेच्या जोरावर ४५ देशातील ६६० शहरात त्यांच्या मालाची विक्री होत आहे.
चौकट
ऑरगॅनिक वुई सामाजिक संस्थेद्वारे दिले ९ हजार शेतकरी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आपले ज्ञान त्यांनी स्वत:पुरते मर्यादित ठेवले नाही. सेंद्रीय शेतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ऑरगॅनिक वुई ही सामाजिक संस्था तयार केली. या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी कार्यरत असल्याने शेतकऱ्यांसाठी शेतावर पंधरा दिवसांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण सुरू केले. शहरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सोसायट्या येथे सेंद्रिय शेती व त्यातील उत्पादनांचे महत्त्व पटवून देत त्यांना प्रशिक्षण दिले जाते. आज जवळपास ९ हजार शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षित केले असून त्यांचा मालाची विक्री ही आंतराष्ट्रीय स्तरावर केली जात आहे.
सेंद्रिय शेतीसाठी देशी गोपालन
सुरवातीला त्यांनी चार देशी गाई घेतल्या. जमिनीची पोत सुधरवण्यात सुक्ष्म जिव महत्वाचीभूमिका बजावत असतात. यामुळे त्यांनी शेणखत तसेच इतर सेंद्रीय खते शेतीत दिली. उत्पन्न वाढल्यानंतर आता त्यांच्याकडे जवळपास ८० च्या आसपास गाई आहेत. त्यातून त्यांना सेंद्रीय खतांचाही खर्च वाचत आहे. दुधापासून त्यांनी देशी तुपाचाहीब्रॅड तयार केला आहे. याला चांगली मागणी आहे.
कोट
शेतीला आम्ही आधुनिकतेची कास दिली आहे. त्यामुळेच आम्ही आमचा ब्रँड आंतराष्ट्री स्तरावर पोहचवू शकलो आहे. वर्षाला साधारणता
१४ कोटींच्या आसपास आमची उलाढाल होते. या माध्यमातून आम्ही रोजगार निर्मितीही केली आहे. कोरोना काळात आम्हाला चांगला फायदा झाला. कारण चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थाना मागणी वाढली होती. इच्छा आणि जिद्द असली काहीही साध्य करता येते हेआम्ही ‘टु ब्रदर ऑरगॅनिक फार्मच्या माध्यमातून सिद्ध केले आहे.ढ़
- सत्यजित हांगे