‘चाळिशी’ गाठली का? लायसन्ससाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:13 AM2021-08-19T04:13:06+5:302021-08-19T04:13:06+5:30

नियम जुनाच : बोगस प्रमाणपत्रला लागणार चाप लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : तुम्ही जर वयाची चाळीशी गाठली असेल आणि ...

Reached 'forty'? Doctor's certificate required for license! | ‘चाळिशी’ गाठली का? लायसन्ससाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

‘चाळिशी’ गाठली का? लायसन्ससाठी लागणार डॉक्टरांचे प्रमाणपत्र!

Next

नियम जुनाच : बोगस प्रमाणपत्रला लागणार चाप

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : तुम्ही जर वयाची चाळीशी गाठली असेल आणि तुम्हाला वाहन परवान्याचे नूतनीकरण अथवा नवीन वाहन परवाना काढायचा असेल तर तुम्हाला आता एमबीबीएस डॉक्टरचे प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाइन दिल्याशिवाय वाहन परवाना मिळणार नाही.

हा नियम पूर्वीदेखील होता. मात्र त्यावेळी बोगस डॉक्टरांची प्रमाणपत्रेही जोडली जात. आता त्याला चाप बसेल. कारण एमबीबीएस डॉक्टरांना आरटीओ प्रशासनाकडे त्यांचे पदवी प्रमाणपत्र जोडून मग परवान्यासाठीच्या प्रमाणपत्राची नोंद करावी लागणार आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे चाळिशीच्या आतबाहेरच अनेकांना विविध व्याधी जडत आहेत. यात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती वाहन चालविण्यास सक्षम आहे की नाही, त्यांचे दोन्ही डोळे पूर्ण क्षमतेने काम करतात की नाही, रातांधळेपणा तर नाही याबाबी तपासूनच डॉक्टर प्रमाणपत्र देणार आहे.

चौकट

१५ हजार ‘लर्निंग’ ऑनलाईन

ज्याच्या परिवहन विभागाने १४ जूनपासून सर्वच प्रकारच्या शिकाऊ परवान्यांसाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली. आतापर्यंत पुणे आरटीओ कार्यालयकडून जवळपास १५ हजार शिकाऊ वाहन परवाने ऑनलाईन देण्यात आले. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने वाहन परवाना काढण्याची सोय आहे. मात्र आता अनेकांचा ओढा ऑनलाईन परवाना काढण्याकडे आहे.

चौकट

वयाची अट नाही, जोपर्यंत ‘फिट’ तोपर्यंत मिळतो परवाना

वाहन परवाना वयाच्या अठरा वर्षांनंतर दिला जातो. पहिल्यांदा काढल्या जाणाऱ्या वाहन परवान्याची मुदत वीस वर्षांची असते. त्यानंतर नूतनीकरण दर पाच वर्षांनी करावे लागते. मात्र वयाच्या किती वर्षांपर्यंत परवाना द्यावा याचा उल्लेख मोटार वाहन कायद्यात नाही. वाहनधारक जोपर्यंत शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तोवर त्यास वाहन परवाना दिला जातो.

चौकट

डॉक्टरला अधिकार वीस प्रमाणपत्रांचाच

पूर्वी डॉक्टर मंडळी ही आरटीओ कार्यालयाच्या परिसरात ठाण मांडून बसलेली असत. एका प्रमाणपत्रासाठी ते पन्नास ते शंभर रुपये घेत. यातले अनेक जण बोगस डॉक्टर असत. शिवाय त्यांनी किती प्रमाणपत्रे द्यावी याला काही निर्बंध नव्हते. आता मात्र तसे नाही. ज्या डॉक्टरचे प्रमाणपत द्यायचे आहे त्याची नोंदणी प्रथम ‘आरटीओ’कडे असणे आवश्यक आहे. शिवाय एका दिवसात एका डॉक्टरला जास्तीत जास्त वीस प्रमाणपत्रे देण्याचाच अधिकार आहे.

कोट

“वाहनधारक वाहन चालविण्यास सक्षम आहे की नाही ते कळण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. ऑनलाईन प्रमाणपत्रामुळे बोगस प्रमाणपत्रास चाप बसेल.”

-डॉ. संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Web Title: Reached 'forty'? Doctor's certificate required for license!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.