पाण्यासाठी पालिकेला पुन्हा इशारा, धरणातील साठा कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 02:48 AM2018-12-20T02:48:11+5:302018-12-20T02:48:33+5:30
धरणातील साठा कमी : कपात केली नाही तर शेतीचे उन्हाळी आवर्तन रद्द
पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराच्या पाणी कोट्याबाबत जलसंपदाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर जलसंपदाने महापालिकेला पाण्याबाबत पुन्हा इशारा दिला आहे. महापालिकेने पाणी वापर कमी केला नाही, तर दौंड, इंदापूरला शेतीसाठी द्यायचे उन्हाळी आवर्तन देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला बजावण्यात आले असल्याचे समजते. पाणी कमी करण्याची ही पूर्वतयारीच असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
महापालिका पाणीपुरवठा अधिकाºयांसमवेत जलसंपदाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी मंगळवारी ही बैठक घेतली. त्यात महापालिकेला शहरातील पाणी वितरणातील गळती थांबवण्याची तंबी देण्यात आली. धरणसाखळीत मागील वर्षापेक्षा सव्वापाच टक्के (५.०१ टीएमसी) कमी पाणीसाठा आहे. तो दररोज कमी होत चालला आहे. शेतीसाठी, तसेच वरील दोन तालुक्यांमधील काही गावांना पिण्यासाठीही पाणी देण्याची जबाबदारी जलसंपदाची आहे. महापालिका असेच दररोज १३५० दशलक्ष लिटर पाणी उचलत राहिल्यास या गावांना उन्हाळ्यात पाणी देणे शक्य होणार नाही, असे महापालिकेला सांगण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
महापालिकेसाठी लोकसंख्येच्या आधारावर ८.१९ टीएमसी वार्षिक कोटा हा जलसंपदाचा निर्णय कायम ठेवतानाच प्राधिकरणाने महापालिकेला ३१ पानांचा एक आदेशही बजावला आहे. त्यात वॉटर आॅडिट करून घेण्याबरोबरच पाण्याच्या काटकसरीचे अनेक उपाय सांगण्यात आले असून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी व त्याचा सविस्तर अहवाल जलसंपदाला सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हे वॉटर आॅडिट त्वरित सुरू करण्याबाबत महापालिकेला मंगळवारी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले.
जलसंपदाच्या या भूमिकेमुळे पुण्याच्या पाणीपुरवठ्यावर
परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाºयांमध्ये आहे.
१ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी
रोज घेतले जात आहे. तेच संपूर्ण शहराला पुरवताना अधिकारी
त्रस्त झाले आहेत. अजूनही
शहराच्या वेगवेगळ्या भागातून पाण्याला प्रेशर नसल्याच्या, पाणी पुरेसा वेळ येत नसल्याच्या तक्रारी
येत आहेत.
प्रेशर कमी झाल्यामुळे सर्वाधिक अडचण शहरांमधील सोसायट्यांची झाली असून त्यांना इमारतींवरील टाक्या भरता येणे अशक्य झाले
आहे. त्यामुळे सदनिकाधारकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पाण्याच्या या प्रश्नाने अद्याप जोर धरला नसला तरी पाणी आणखी कमी झाले तर मात्र पुन्हा शहरात रोष निर्माण होण्याची शक्यता आहे.
पाणी काटकसरीबाबत जागृती करावी
1150
दशलक्ष लिटर मंजूर कोटा असतानाही महापालिका १ हजार ३५० दशलक्ष लिटर पाणी घेत असल्याचे या बैठकीत महापालिका अधिकाºयांच्या लक्षात आणून देण्यात आले.
प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्यास वार्षिक ८.१९ टीएमसी याप्रमाणे दररोज फक्त ६९२ दशलक्ष लिटर पाणीच पुण्याला द्यावे लागेल, असेही बजावण्यात आले.
४त्यामुळे १ हजार १५० दशलक्ष लिटरच पाणी घ्यावे, असे महापालिकेला सांगण्यात आले आहे. इतके पाणी पुरेसे होत नसेल तर त्यासाठी महापालिकेनेच शहरात पाणी काटकसरीने वापरण्याबाबत नागरिकांमध्ये जागृती करावी, वितरणातील गळती थांबवण्याचे कसोशीने प्रयत्न करावेत, असे बैठकीत बजावण्यात आले.