एका चपलेमुळे ३ वर्षांच्या मुलाच्या खुनाला फुटली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:10 AM2021-05-07T04:10:54+5:302021-05-07T04:10:54+5:30

मार्केटयार्ड येथील घटना : मावशीला अटक लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘माय मरो पण मावशी जगो’ अशी म्हण आहे. ...

Read about the murder of a 3-year-old boy due to a slipper | एका चपलेमुळे ३ वर्षांच्या मुलाच्या खुनाला फुटली वाचा

एका चपलेमुळे ३ वर्षांच्या मुलाच्या खुनाला फुटली वाचा

Next

मार्केटयार्ड येथील घटना : मावशीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : ‘माय मरो पण मावशी जगो’ अशी म्हण आहे. मात्र, त्याच्या नेमका विरुद्ध प्रकार मार्केट यार्ड येथे घडला. मावशीनेच आपल्या ३ वर्षांच्या भाच्याचा पाण्यात बुडवून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी निर्मला कैलास वर्मा (रा. लेबर कॅम्प, मार्केट यार्ड) या महिलेला अटक केली आहे. मृत्यू झालेल्या मुलाच्या चपलेचा जोड वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आल्याने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्यातून खून उघडकीस आला.

चाकेन अवधेश वर्मा (वय ३) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अवधेश धनीराम वर्मा (वय २७, रा. मार्केट यार्ड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना १ मे रोजी मार्केट यार्ड परिसरातील बांधकाम साईटवर घडली. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती.

युनी इंडिया वास्तू कंपनीचे मार्केट यार्ड येथे बांधकाम सुरु आहे. १ मे रोजी इमारतीमध्ये लिफ्टसाठी ठेवलेल्या जागेतील पाण्यात एका ३ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे सर्व बांधकाम मजूर असल्याने मुलगा खेळत गेला असावा व त्यातून तो पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असे प्राथमिक बाबीवरून दिसून येत होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा एक बाब लक्षात आली. मुलाची एक चप्पल घटनेच्या ठिकाणी तर दुसरी लांब पडलेली आढळून आली. या मुद्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले.

त्यानंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा निर्मला वर्मा ही इमारतीत जात असताना तिच्या मागोमाग चाकेन हा मुलगा जात असल्याचे दिसून आले. काही वेळाने ही बाहेर आली. पण, मुलगा बाहेर आला नाही. पोलिसांनी बांधकाम मजुरांकडे चौकशी केल्यावर फिर्यादीच्या घरच्यांच्या बाबतीत चारित्र्यावरून संशय असल्याचे समोर आले. त्यावरून त्यांच्यात भांडणे झाल्याची माहिती समोर आली.

त्यामुळे पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्मला हिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. त्यानंतर तिने आपण रागाच्या भरात चाकेन याला उचलून घेऊन लिफ्टच्या खड्ड्यातील पाण्यात टाकून दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिला अटक केली आहे. घटनास्थळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सापडलेल्या चपलेवरून पोलिसांनी हा खरा प्रकार शोधून काढला.

Web Title: Read about the murder of a 3-year-old boy due to a slipper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.