सोशल मीडियावर वेळ घालविण्यापेक्षा पुस्तके वाचा : के. व्यंकटेशम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:58 PM2019-06-03T13:58:12+5:302019-06-03T13:58:30+5:30
सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो हे आपणच तपासायला हवे.
पुणे : सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक कुटुंबांमध्ये कीप मुव्हिंगपेक्षा कीप अर्निंग असे चित्र दिसत आहे. पूर्वीच्या काळी सर्व जण एकत्र कुटुंबामध्ये राहत. त्यामुळे चांगल्या-वाईट गोष्टींची समज घरातील मोठी माणसे देत असत. परंतु, सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत चांगल्या वाईट गोष्टींची समज आपल्यालाच येणे आवश्यक आहे. विद्यार्थीसोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो हे आपणच तपासायला हवे. चांगल्या लोकांशी संगत जोडा. सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा चांगली पुस्तके वाचा, असे मत पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांनी व्यक्त केले.
भावनिक कौशल्यांविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी लाईफ स्कूल फाऊंडेशनतर्फे कीप मुव्हिंग मुव्हमेंट उपक्रमांतर्गत व्याख्यानमालेचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. यावेळी लाईफ स्कूलचे संस्थापक नरेंद्र गोईदानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रशांत शहा, ज्योती गोसावी आणि ७००
हून अधिक स्वयंसेवक उपस्थित
होते.
नरेंद्र गोईदानी म्हणाले, की प्रत्येक माणूस जोपर्यंत आनंदी राहत नाही, तोपर्यंत चांगले काम त्याच्याकडून होत नाही. तुम्ही आनंदी असाल तरच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील.
आपले आयुष्य आपण कसे घडवायचे हे निवडण्याची संधी प्रत्येकाला मिळते. त्यामुळे आपणच आपल्यासाठी योग्य निवडले पाहिजे. परिस्थितीला दोष देण्यापेक्षा ती कशी बदलेल, यासाठी प्रयत्न करा. आपल्या आजूबाजूला असलेला मित्रवर्गदेखील चांगला निवडला पाहिजे. या सर्व गोष्टींमुळे आपली प्रगती होईल.
.........
यशस्वी जीवन जगण्याची आवश्यक तत्त्वे
१ या उपक्रमांतर्गत पुण्यातील महानगरपालिकेच्या विविध शाळेत ३ महिन्यांत ७ व्याख्याने घेतली जातात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, ध्येयवाद, प्रेरणा निर्माण व्हावी, यादृष्टीने त्यांना शिकविले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण होईल.
२ यामध्ये भावनिक कौशल्ये रुजविण्याचे प्रयत्न केले जातात. मागील १८ वर्षांपासून ९ वी आणि १० वीतील मुलांना अभ्यासासोबतच यशस्वी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक तत्त्वे लाईफ स्कूल फाउंडेशनच्या कीप मुव्हिंग मुव्हमेंट या उपक्रमांतर्गत शिकविण्यात येतात. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना योग्य प्रकारे घडविणे हे शिक्षकांच्या आणि समाजाच्या हातात असते.