जन्म-मृत्यू नोंदीसाठीचे हेलपाटे वाचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:09 AM2021-06-11T04:09:09+5:302021-06-11T04:09:09+5:30

निलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जन्म-मृत्यूचे दाखले हे क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथे केवळ जन्म-मृत्यू कागदपत्रांची मुख्य ...

Read help for birth and death registration | जन्म-मृत्यू नोंदीसाठीचे हेलपाटे वाचणार

जन्म-मृत्यू नोंदीसाठीचे हेलपाटे वाचणार

Next

निलेश राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जन्म-मृत्यूचे दाखले हे क्षेत्रीय कार्यालय, मुख्य कार्यालय येथे केवळ जन्म-मृत्यू कागदपत्रांची मुख्य संगणकीय नोंदणी न झाल्याने, वारंवार खेटा घालूनही महिनोंमहिने नागरिकांना मिळत नव्हते. पण आता ही तक्रार यापुढे कमी होणार आहे. कारण, महापालिकेने जन्म-मृत्यू घटनांच्या मुख्य नोंदीच (केंद्र शासनाने अंगिकृत केलेल्या नागरी नोंदणी पध्दतीत) क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे एकाच ठिकाणी नोंदी व तेथूनच दाखले वितरण ही नवी पद्धती शुक्रवारपासून (दि. ११) अंमलात येणार आहे.

शहरातील पंधरा क्षेत्रीय कार्यालयांमधील क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांनाच महापालिकेने ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू’ नोंदणीचे कामकाज करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे रुग्णालयातून मिळणारी जन्म-मृत्यू संदर्भातील कागदपत्रे घेऊन, कसबा पेठेतील मुख्य कार्यालय अथवा परिमंडळ कार्यालयाकडे जाण्याची आवश्यकताच भासणार नाही. परिणामी कागदपत्रे पोहोचली का, नोंदणी झाली की नाही, झाली असेल, तर ती क्षेत्रीय कार्यालयात आली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत.

नव्या निर्णयानुसार रुग्णालयातून आलेल्या जन्म-मृत्यूच्या घटनांच्या मुख्य नोंदी क्षेत्रीय कार्यालय स्तरावरच क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करून, तेथून लागलीच नागरिकांना दाखले द्यावेत, असा आदेश महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी गुरुवारी दिले. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदी करणे, जन्म दाखल्यात बाळाचे नाव समाविष्ट करणे, जन्म व मृत्यू दाखल्यांमध्ये कायदेशीर बाबीनुसार किरकोळ दुरुस्त्या करणे, जन्म व मृत्यू दाखल्यांबाबत न्यायालयीन कामकाज/दावे आदी प्रकरणांमध्ये उपस्थित राहणे तसेच जन्म-मृत्यू नोंदणी कायदा १९६९-२००० अंतर्गत सर्व कामकाज करण्याचे अधिकार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

चौकट

दोघेच होते फक्त

यापूर्वी महापालिकेकडे ‘उपनिबंधक, जन्म-मृत्यू’ नोंदणीचे कामकाज करणारे केवळ दोन अधिकारी होते आता हे अधिकार सर्व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळाल्याने नोंदी वेळेत होण्याची अपेक्षा आहे. प्राप्त झाले आहेत़

चौकट

अशी होती पूर्वीची जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया

जन्म-मृत्यूच्या वर्दी संबंधित रुग्णालयांकडून, नातेवाईकांकडून प्रथम क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जमा होत असे. तेथून ही माहिती कसबा पेठेतील मुख्य जन्म-मृत्यू कार्यालयात जाई. तेथे ती संगणकीय प्रणालीत नोंदवली जायची. त्यानंतर नोंदणी क्रमांक संबंधित क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाठविला जात असे. त्यानंतरच क्षेत्रीय कार्यालयांमधील नागरी सुविधा केंद्रातून नागरिकांना जन्म अथवा मृत्यूचे दाखले मिळत. डिसेंबर २०२० मध्ये मुख्य कार्यालयाबरोबरच जन्म-मृत्यू घटनांच्या नोंदींचे अधिकार हे परिमंडळ विभागांनाही दिले. यातही विलंब होऊ लागल्याने नव्या आदेशानुसार आता ‘रुग्णालय ते क्षेत्रीय कार्यालय व थेट नागरिक’ अशी प्रक्रिया सुलभ केल्याचे जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालय प्रमुख तथा सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

चौकट

रुग्णालयांकडून सहकार्याची अपेक्षा़

जन्म-मृत्यू नोंदणी कायद्यानुसार जन्म-मृत्यूच्या घटनांची आवश्यक कागदपत्रांसह माहिती ही रुग्णालयांनी स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांना २१ दिवसांच्या आतमध्ये द्यायची असते. अनेक रुग्णालये ही दहा-वीस घटनांची माहिती गोळा सादर करतात. त्यामुळे एखादी घटना १ तारखेला घडली तरी त्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे २१ दिवसांपर्यंत येऊ शकते व त्यानंतर पाठविलेली माहिती किरकोळ दंड आकारून स्वीकारली जाते. आता क्षेत्रीय कार्यालयांनाच नोंदीचे अधिकार दिल्याने, रुग्णालयांनी जन्म-मृत्यूच्या घटनांची माहिती लागलीच क्षेत्रीय कार्यालयांना दिली तर, नागरिकांना लवकरात लवकर दाखले मिळू शकतील. रुग्णालयांनी जन्म-मृत्यूच्या घटनांची माहिती क्षेत्रीय कार्यालयांकडे तत्काळ सादर करावी असे आवाहन महापालिकेने केले आहे.

चौकट

“नागरिकांना कमीत कमी वेळेत जन्म व मृत्यूचे दाखले मिळण्याकरिता, जन्म-मृत्यू नोंदीचे अधिकार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. दाखले मिळण्यासाठीच्या कार्यालयीन प्रक्रियेतला मोठा कालावधी यामुळे वाचणार आहे.”

रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

----------------------------

Web Title: Read help for birth and death registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.