पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या अमानुष घटनेला अशी फुटली वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:29 AM2021-09-07T06:29:06+5:302021-09-07T06:29:45+5:30

राज्यभरात संतापाची लाट; कहाणी ऐकून पोलीसही स्तब्ध

Read the outrageous incident of gang rape in Pune pdc | पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या अमानुष घटनेला अशी फुटली वाचा

पुण्यातील सामूहिक बलात्काराच्या अमानुष घटनेला अशी फुटली वाचा

googlenewsNext
ठळक मुद्देपुण्यात वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलीवर राजरोसपणे असे अत्याचार होणे गंभीर बाब आहे. आरोपी मोकाट सुटतात, म्हणून इतरांचेही धाडस वाढते आणि दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होत राहते.

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीडित मुलीचे आईवडील वानवडी भागात राहतात. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नाही, हे पाहून त्यांनी शोधाशोध सुरू केली. शेवटी त्यांनी १ सप्टेंबर रोजी वानवडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना तिच्या मोबाईलचे लोकेशन पुणे स्टेशन परिसरात आढळून आले. त्यादृष्टीने पोलिसांनी शोध सुरू केल्यावर एका लॉजमध्ये ही मुलगी आढळली.

मुलीबरोबर दिसलेल्या दोन रेल्वे कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी तातडीने विविध पथकांची नेमणूक करून या गुन्ह्यातील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. त्याचवेळी दुसरीकडे पीडित मुलीचा शोध सुरू होता. तिचा मोबाईल चालू-बंद होत असल्याने तिचे लोकेशन मिळत नव्हते. तांत्रिक विश्लेषणात ती मुंबईहून चंडीगडकडे जाणाऱ्या रेल्वेत असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर रेल्वे अधिकारी व पोलिसांशी संपर्क साधून मुलीला चंडीगड येथे थांबविण्यात आले. वानवडी पोलिसांच्या पथकाने विमानाने चंडीगडला जाऊन या मुलीला रविवारी (दि. ५) सुरक्षितपणे पुण्यात आणले. त्यानंतर तिच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यावर तिच्यावरील अत्याचाराची कहाणी ऐकून पोलीसही स्तब्ध झाले. तातडीने चक्रे फिरवित रात्रीत आठही आरोपींच्या आवळल्या.

लॉज, रेल्वे कार्यालयात केला अत्याचार  
n८ आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असून त्यातील अटक आरोपी व ५ फरार आरोपींनी मिळून निर्जनस्थळी, जंगलात, लॉजवर व रेल्वे ऑफिसमध्ये अशा ३ ते ४ ठिकाणी या पीडितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. 
nयातील ५ फरार आरोपींचा शोध घ्यायचा आहे. रिक्षाचालक मशाक कान्याल व मीरा शेख यांनी रिक्षामध्येही तिच्यावर अत्याचार केला आहे. ती रिक्षा जप्त करायची आहे. तसेच या सर्व ठिकाणी जाऊन पंचनामा करायचा आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वांना १० दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

अटक आरोपींची नावे : मशाक अब्दुल मजिद कान्याल (वय २७, रा. वैदूवाडी, हडपसर), रफिक मुर्तजा शेख (३२), अकबर उमर शेख (३२, जुना बाजार, मंगळवार पेठ), अजरुद्दीन इस्लामुद्दीन अन्सारी (२७, कासेवाडी), प्रशांत सॅमियल गायकवाड (३२, ताडीवाला रोड), राजकुमार रामनगीना प्रसाद (२९, रा. घोरपडी गाव), नोईब नईम खान (२४, बोपोडी), असिफ फिरोज पठाण (३६, लोहीयानगर) अशी आरोपींची नावे असून, न्यायालयाने त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दोन रेल्वे कर्मचारी निलंबित : दोन आरोपी हे रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाल्यावर पुणे रेल्वे प्रशासनाने प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) व राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक व देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) यांना निलंबित केले.

फास्ट ट्रॅक कोर्ट हवे
समाजाची मानसिकता भयावह होत चालली आहे. अत्याचाराच्या घटना ऐकून मन सुन्न होते. घटनेनंतर प्रतिक्रिया येतात, निषेध नोंदवले जातात. घटना घडू नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार करायला हवा. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. 
- रूपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

सन्मान हवा
आजही देशात २५ मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो. चौदा वर्षांची मुलगी घराबाहेर का पडली? तिला गावाकडे जायचे काय कारण होते? असे मुद्दे आपण उपस्थित करू शकत नाही. कारण मुलींना सुरक्षितता असलीच पाहिजे. बाईचा सन्मान व्हायला हवा.
- मुक्ता मनोहर, ज्येष्ठ कामगार नेत्या

मदतीचा हात द्या
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली. याबाबत तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी नम्रता पाटील यांच्याशी माझी सविस्तर चर्चा झाली आहे. समाजोपयोगी काम करणाऱ्या व्यक्तींनी, संस्थांनी एकत्र येऊन संरक्षणासाठी काम करावे, मदतीचा हात द्यावा. स्त्री आधार केंद्राच्या मदतीने पोलिसांनी एका वर्षात शंभर मुलींचा जीव वाचवला. अशा पद्धतीच्या प्रतिबंधात्मक कामाची सध्या गरज आहे. त्याबाबतच्या सूचना पुणे पोलिसांना दिल्या आहेत. महाराष्ट्रात इतर ठिकाणीही रेल्वे, बस स्टँड अशा परिसरात स्थानिक पोलिसांनी महिला सुरक्षिततेचे कार्यक्रम राबवावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
- डॉ. नीलम गोऱ्हे, 
उपसभापती, विधानपरिषद

पुणे सुरक्षित राहिले नाही
पुण्यात वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलीवर राजरोसपणे असे अत्याचार होणे गंभीर बाब आहे. आरोपी मोकाट सुटतात, म्हणून इतरांचेही धाडस वाढते आणि दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होत राहते. कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तरच अशा घटना आटोक्यात येतील. त्यासाठी कठोर आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी शासनाला विनंती आहे. विश्वास कोणावर ठेवायचा? आरोपींच्या वयाचा विचार न करता कठोर कारवाई व्हायला हवी.
- मेधा कुलकर्णी, उपाध्यक्ष, 
राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजप

Web Title: Read the outrageous incident of gang rape in Pune pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.