दिवाळी अंकातून वाचकांचा साहित्यिकांशी संवाद : डॉ. रामचंद्र देखणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:45+5:302021-07-11T04:09:45+5:30
पुणे : दिवाळी अंक हा लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचा एक आनंद सोहळा आहे. एका पुस्तकातून एका ...
पुणे : दिवाळी अंक हा लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचा एक आनंद सोहळा आहे. एका पुस्तकातून एका लेखकाशी शब्दसंवाद घडतो, पण एकाच दिवाळी अंकातून अनेक साहित्यिकांशी वाचकांचा संवाद होतो. दिवाळी अंक हे वाड्मयीन इंद्रधनुष्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील (२०२०) विजेत्यांना डॉ. देखणे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे 'रत्नाकर पारितोषिक' 'आंतरभारती' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ऋतुरंग' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'चपराक' ला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'महाराष्ट्र नामा' ला, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'सायबर साक्षर' या दिवाळी अंकाला देण्यात आले. याशिवाय 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'छावा' या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'साहित्यदीप' या दिवाळी अंकातील डॉ. भारती पांडे यांच्या 'प्रेम सेवा शरण' या कथेला आणि उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'साप्ताहिक सकाळ' या दिवाळी अंकातील आदिती पटवर्धन यांच्या 'विलक्षण ब्रम्हपुत्र' या लेखाला देण्यात आले. यावेळी छंद' या दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन, तर सुनीताराजे पवार यांनी आभार मानले.
---------------------
दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वषार्नुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटत आहे.
- प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
-------------------------------------------------------------------------