वाचनसंस्कृतीसाठी पुस्तक दिंडी
By admin | Published: March 29, 2017 02:40 AM2017-03-29T02:40:05+5:302017-03-29T02:40:05+5:30
गुढी चैतन्याची, मांगल्याची गुढी संस्काराची आणि पुस्तकांची, असे म्हणत वाचनसंस्कृती जोपासण्याचा दिलेला संदेश... भाषासंवर्धनाचा संकल्प
पुणे : गुढी चैतन्याची, मांगल्याची गुढी संस्काराची आणि पुस्तकांची, असे म्हणत वाचनसंस्कृती जोपासण्याचा दिलेला संदेश... भाषासंवर्धनाचा संकल्प करीत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी आणि पारंपरिक वेशात सहभागी झालेली तरुणाई अशा उत्साही वातावरणात ‘सण करू साजरे, माध्यम जरा वेगळे’ हे ब्रीद जपणाऱ्या तरुणाईने गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडी काढली. मैत्रयुवा फाऊंडेशनतर्फे बाजीराव चौकापासून सकाळी १०.३० वाजता आचार्य अत्रे सभागृहात पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, राज्य उत्पादन शुल्क पुणेचे अधीक्षक मोहन वर्दे, लष्कर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, प्रा. सुरेश माळी, दिलीप कोटीभास्कर, डॉ.सचिन वानखेडे, सहेला संस्थेच्या तेजस्वी सेवेकरी, बालसदनच्या अश्विनी नायर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी उपस्थित होते.
मिलिंद जोशी म्हणाले, ‘सर्जनशील आणि संवदेनशील गुढीची उभारणी आज आपण केली आहे. या माध्यमातून नवनिर्मिती आणि समाजासाठी काम करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळणार आहे.’(प्रतिनिधी)
जगामध्ये सहा हजार भाषा आहेत. त्यामध्ये मराठी भाषेचा सतरावा क्रमांक लागतो. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी तरुणाईने पुढे यायला हवे.
- डॉ. रामचंद्र देखणे