अलंकापुरी कार्तिकी यात्रेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:07 AM2020-12-07T04:07:36+5:302020-12-07T04:07:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आळंदी : संतश्रेष्ठ श्री.ज्ञानोबारायांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आळंदी : संतश्रेष्ठ श्री.ज्ञानोबारायांच्या ७२४ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यास अर्थात आळंदीच्या कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन, तसेच मंदिर देवस्थान कमिटी सज्ज झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची कार्तिकी वारी जरी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असली, तरीसुद्धा वारीदरम्यान कुठलीही अनपेक्षित घटना घडू नये त्यादृष्टीने सुरक्षेला महत्त्व देण्यात आले आहे. यात्रेदरम्यान अलंकापुरीसह मंदिर परिसरात ''''तिसरा डोळा'''' अर्थात सीसीटीव्हीचाही वॉच असणार आहे.
आळंदीत माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त ८ डिसेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. एकादशी ११ डिसेंबरला, तर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरला पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार रविवारपासून (दि. ६) संपूर्ण आळंदी शहरात, तसेच आसपासच्या दहा गावांत संचारबंदी लागू केली आहे. आळंदीला जोडणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवा वगळता इतरांच्या प्रवेशास पोलीस बंदोबस्तात बंद करण्यात आले आहेत. तर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.
कार्तिकी वारीसाठी शहरात पोलीस प्रशासनाचा जादा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोहळासंपेपर्यंत २४ तास खडा पहारा दिला जाणार आहे. यासाठी तीन सहायक पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोळा पोलीस निरीक्षक, चारशे पोलीस कर्मचारी, पंचाहत्तर महिला पोलीस कर्मचारी, दोनशे होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
शहरातील प्रमुख असलेल्या चाकण चौक, वडगाव चौक, हजेरी मारुती, मरकळ चौक, पोलीस ठाणे परिसर, भराव रस्ता, नगरपरिषद परिसर, बसथांबा परिसर तसेच मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील संपूर्ण तयारी पूर्ण झाल्याची माहिती व्यवस्थापक माऊली वीर यांनी दिली.
चौकट :
कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर चाकण - शिक्रापूर महामार्गाकडून आळंदीकडे येणारी वाहतूक शेलगाव फाट्यापासून कोयाळीमार्गे मरकळला वळविण्यात आली आहे. पुणे - नगर महामार्गकडून आळंदीकडे येणारी वाहतूक मरकळमार्गे चाकण - शिक्रापूर हायवेकडे वळविली आहे. तर पुण्याकडून आळंदीला येणारी वाहतूक भोसरीमार्गे पुणे - नाशिक मार्गाकडे वळविण्यात आली आहे.
कोट
“ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत कार्तिकी सोहळा संपन्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आळंदीसह आजूबाजूच्या गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी आळंदीला येणे टाळावे. चालू वर्षी ऑनलाइन दर्शन घ्यावे. विनापरवानगी आळंदीत आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- ज्ञानेश्वर साबळे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक आळंदी.
फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत.(छायाचित्र : भानुदास पऱ्हाड)