तिसऱ्या लाटेसाठी बारामतीत सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:11 AM2021-09-03T04:11:07+5:302021-09-03T04:11:07+5:30
बारामती : शहर आणि तालुक्यात संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे. तिसरी लाट आल्यास ...
बारामती : शहर आणि तालुक्यात संभाव्य कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे. तिसरी लाट आल्यास प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व रुईचे अधीक्षक डॉ. सुनील दराडे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली.
तिसरी लाट आल्यास नागरिकांना उपचार करण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत. रुग्णांना वेळेवर उपचार, गरज पडल्या ॲाक्सिजन पुरवठा करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. दुसऱ्या लाटे दरम्यान आलेल्या अडचणींच्या अनुषंगाने रुग्णांसाठी कोणतीही कमतरता भासणार नसल्याचे या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
बेडस, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्सची संख्या अपुरी पडू नये यासाठी आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासह रुई ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाशेजारील नर्सिंग वसतिगृहाच्या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या रुई रुग्णालयामागील बाजूस शंभर खाटांची क्षमता असलेले मोड्यूलर हॉस्पिटल येथे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातही कॅपजेमिनी कंपनीच्या सहकार्याने २० खाटांच्या क्षमतेचे आयसीयू बेड्सचे युनिट उभारणीचे काम सुरू झाले आहे. १२० ऑक्सिजन पुरवठा असलेल्या बेडची येथे लवकरच सुविधा सुरू होईल.
वैद्यकीय महाविद्यालय, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय तसेच रुई ग्रामीण रुग्णालय परिसरात नव्याने ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प कार्यान्वित झालेले आहे. हवेतील ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पासह लिक्विड ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात उपलब्ध होईल, त्यासाठी एजन्सींना जबाबदारी देण्यात आली आहे.
—————————————————