'रिअल हिरो'; लग्नासाठी जमवलेले पैसे गरजूंच्या अन्नपाण्यासाठी खर्च करणाऱ्या 'रिक्षाचालकाची पॉझिटिव्ह गोष्ट'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 04:47 PM2020-05-21T16:47:59+5:302020-05-21T16:54:25+5:30
'आधी लढाई कोरोनाशी' म्हणत रिक्षाचालकाने लग्न पुढे ढकलले
पुणे: कोरोना काळात स्वत:चे लग्न पुढे ढकलून 'आधी लढाई कोरोनाशी' म्हणत स्वत:च्या लग्नाचा खर्च समाज सेवेसाठी सत्कारणी लावणारा एक रिक्षाचालक खऱ्या अर्थाने ' रिअल हिरो' ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच वडिलांचे देहावसान झाले. परंतु स्वत:चे दु:ख बाजूला सारून इतरांचे अश्रू पुसण्याचे काम तो करीत आहेत. या त्याच्या सामाजिक सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पुण्याच्या टिंबर मार्केट भागात राहणाऱ्या या रिक्षाचालकाचे नाव आहे अक्षय कोठावळे. येत्या 25 मे ला त्याचा विवाह सोहळा पार पडणार होता. पण कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अन्नपाण्यावाचून तडफडणारे जीव पाहून अक्षयचा जीव कळवळला... सहचारिणी आणि घरच्यांनी साथ दिली. लग्न पुढे ढकलले आणि मित्रपरिवाराच्या साथीने त्याने मदतकार्य करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या वाड्यातच त्याने किचन उभे केले आहे. शेजारीपाजारी महिला तिथे अन्न शिजवून देतात. रविंद्र गायकवाड, राहूल जाधव या मित्रांच्या साथीने दररोज १००-१५० भुकेल्या जीवांना अक्षय अन्न पुरवतो. पुणे स्टेशन, मालधक्का, सिंचनभवन, येरवडा, बंडगार्डन, शिवाजीनगर, मनपा भवन, टिंबरमार्केट कुठूनकुठून मदतीसाठी त्याला फोन येतात. मग तो मित्रांना घेऊन मदतीला धावत जातो.
या समाज कार्याविषयी ' लोकमत' शी बोलताना अक्षय म्हणाला, या कोरोना काळात रिक्षेला लावण्यात आलेल्या भोंग्यामधून मी नागरिकांची जनजागृती करीत होतो. पण रिक्षा चालवताना खायला काही आहे का? अशी विचारणा व्हायची आणि त्याने काळीज गलबलून जायचे. मग यातून गरजूंना अन्नदान देण्याचे ठरविले आणि मित्रांनी सहकार्य केले. अडीअडचणीच्या वेळी गरोदर महिला,अपंग वृद्ध रुग्णांना देखील मदत करू लागलो. त्यांना स्वत:च्या रिक्षातून रुग्णालयापर्यंत मोफत ने-आण करण्याचे काम करतो. पुणे शहर,पुणे शहराचा मध्यवर्ती भाग आणि आजूबाजूचा परिसर,येरवडा, वानवडी ,शिवाजीनगर,पुणे स्टेशन , पर्वती,हडपसर,घोरपडी, मार्केट यार्ड या भागातील राहणाऱ्या नागरिकांना अन्न दानाची व इतर सेवा निरंतर देणं चालू आहे.
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदीर ट्रस्टचे विश्वस्त शिरीष मोहिते, शाहीर हेमंत माळवे, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आणि रिक्षा चालक संघटनेचे खजिनदार बापू भावे यांनी अक्षयच्या या बहुमोल कायार्ची दखल घेऊन ट्रस्टतर्फे सत्कार केला.
.........