सवलत आहे असे समजून लोणी काळभोरला सर्वच दुकाने उघडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:10 AM2021-06-02T04:10:24+5:302021-06-02T04:10:24+5:30
आर्थिक चक्र सुरळीत व्हावे यासाठी राज्य शासनाने ज्या जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या ...
आर्थिक चक्र सुरळीत व्हावे यासाठी राज्य शासनाने ज्या जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात पॉझिटिव्ह रेट १० टक्केपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी लॉकडाऊनमधून काही बाबी शिथिल करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मंगळवारपासून (दि. १) महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्यक वस्तुविक्री व सेवा देणारे, किराणा दुकाने, भाजीबाजार यांच्यावरील वेळेच बंधन मागे घेण्यात आले. परंतु सदर नियम आपणांसही लागू झाला आहे, असा समज करून घेऊन पहिल्याच दिवशी लोणी काळभोर परिसरातील नागरिक भाजीपाला व इतर वस्तू खरेदीसाठी बाहेर पडले. त्यामुळे सकाळपासूनच बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर आणल्याने त्यात आणखी भर पडली. हा प्रकार म्हणजे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशात बाधा आणली जात आहे. आपण घराबाहेर पडताना लॉकडाऊन उठले असले तरी कोरोना मात्र ठाण मांडून बसला आहे. दररोज क्षणोक्षणी त्याची तीव्रता वाढत आहे. ही बाब मात्र नागरिक विसरल्याचे जाणवत होते.
जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा कमी झाला नसल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील निर्बंध आणखी आठवडाभर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजताच अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली. त्यामुळे गावातील गर्दी कमी झाली. लॉकडाऊन असले तरी कपडे, सौंदर्यप्रसाधने, चपला व इतर दुकाने बहुतांश वेळा उघडल्याचे दिसत असले तरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमाला हरताळ फासला जात आहे. या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.
लोणी काळभोरमध्ये झालेली गर्दी.