रस्ता ताब्यात घेण्याच्या कारणावरून गदारोळ
By admin | Published: May 8, 2015 05:17 AM2015-05-08T05:17:48+5:302015-05-08T05:17:48+5:30
दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इरिगेशनचा रस्ता ताब्यात घेण्याच्या कारणावरून एकच गदारोळ झाला. परंतु सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा रस्ता
दौंड : दौंड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत इरिगेशनचा रस्ता ताब्यात घेण्याच्या कारणावरून एकच गदारोळ झाला. परंतु सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी हा रस्ता महत्त्वाचा आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून सदरचा रस्ता ताब्यात घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, या ठरावावर नगरसेवक गुरुमुख नारंग तटस्थ राहिले.
दौंड नगर परिषदहद्दीतील इरिगेशन चारी क्र. ३0 मायनर-२ चा रस्ता नगर परिषदेच्या ताब्यात घेण्याचा निर्णय व्हावा, यासाठी हा ठराव वाचून दाखवताच गुरुमुख नारंग म्हणाले, की या रस्त्याच्या कारणावरून मुख्याधिकारी शिवाजी कापरे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. हा रस्ता ताब्यात घेतला, तर या रस्त्यासाठी नगर परिषदेला खर्च करावा लागेल. तेव्हा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊनच या रस्त्यावर खर्च करा, असे म्हणताच एकच गोंधळ उडाला. तेव्हा गुरुमुख नारंग म्हणाले, की सभासदांना अंधारात ठेवून तुम्ही कामकाज करता, याला आमचा आक्षेप आहे. यावर ज्येष्ठ नगसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले, की वास्तविक पाहता इरिगेशनचा रस्ता समाजाच्या हितासाठी महत्त्वाचा आहे. परंतु विकासकामे करीत असताना मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होतो, ही खेदाची बाब आहे. तेव्हा या घटनेचा सर्व नगरसेवकांनी मिळून निषेध करायला पाहिजे. राजू बारवकर म्हणाले, नगरसेवक गुरुमुख नारंग यांनी गेल्या राजकीय दबाव आणून नगराध्यक्ष कुरकुंभ मोरीच्या कामासाठी रेल्वेकडे सुपूर्त करण्यासाठी धनादेशावर सही करीत नसल्याबाबत एक पत्र मुख्याधिकाऱ्यांकडून नेले, ही गंभीर बाब आहे.