पुणे महानगरपालिकेच्या कारकून भरतीत गडबडीचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 07:26 PM2018-12-20T19:26:21+5:302018-12-20T19:31:06+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे म्हणणे आहे...
पुणे: महापालिकेच्या कारकून भरतीमध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय पीएमसी एम्प्लॉईज युनियनने व्यक्त केला आहे.चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून तृतीय श्रेणीत घेण्यासाठी म्हणून घेतलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर न करता थेट यादीच जाहीर करून त्यात अपात्र उमेदवारांची नावे घुसडण्याचा प्रकार झाला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे.
महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये सुशिक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या बरीच मोठी आहे. वारसा हक्काने नोकरी मिळत असल्याने शिक्षण असूनही नोकरीची संधी मिळाली की ते लगेच नोकरी स्विकारतात. त्यानंतर मग वरच्या वर्गात येण्यासाठी प्रयत्न करतात. खात्यातंर्गत परीक्षा घेऊन अशा उमेदवारांना तृतीय श्रेणीत टंकलेखक किंवा कारकून म्हणून सामावून घेतले जाते. त्यासाठी त्यांची सेवेची ५ वर्षे पुर्ण झाली असल्याचे बंधन घालण्यात येते. त्याशिवाय किमान १० वी उत्तीर्ण वगैरे अटीही असतात.
अशा २६७ पात्र उमेदवारांची सामान्य प्रशासन विभागाने जून २०१८ मध्ये जाहीर केली. त्यांची २२ जुलै २०१८ रोजी परिक्षा घेतली. त्याचा निकाल अजूनही जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र परीक्षेस बसता न आलेल्या, कागदपत्र अपुर्ण असल्यामुळे अपात्र ठरलेल्या अशा ११७ जणांची एक यादी १२ डिसेंबर २०१८ ला प्रसिद्ध केली. त्यांना १५ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे आणून देण्यास सांगण्यात आले. या यादीत बरीच नावे प्रशासनाने दिलेल्या ५ वर्षे सेवेच्या मुदतीत बसणारी नाहीत.
या यादीवर काहीजणांना आक्षेप घेतला. त्यानंतर प्रशासनाने १३ डिसेंबरला एक शुद्धीपत्रक काढले. त्यानंतर ते शुद्धीपत्रक १४ डिसेंबरला लागलीच रद्द केले. १५ डिसेंबरला एक परिपत्रक काढले. त्यात ४३ जणांची यादी प्रसिद्ध केली. यातच पुन्हा ५ वर्षांचे सेवाकाल पुर्ण झाला नसलेली नावे घुसडण्यात आली. त्यांना प्रशिक्षण देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. १७ डिसेंबर ते १९ डिसेंबरदरम्यान हे १३ तासांचे प्रशिक्षण सत्र पुर्णही झाले.
सेवाकाल पुर्ण करत नसलेल्या, अपात्र असलेल्या उमेदवारांना यादीत बसवण्यासाठी म्हणून हा सर्व उपदव्याप करण्यात आला असल्याचे युनियनचे म्हणणे आहे. काही नगरसेवक तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांनीच हा खटाटोप केला असल्याची चर्चा आहे. मात्र त्यामुळे पदवीधर असलेल्या व तरीही चतुर्थ श्रेणीतच काम करावे लागत असणाऱ्या पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे. केवळ ५ वषार्चा सेवाकाल पुर्ण होत नसल्याने ते अपात्र समजले गेले आहेत, मात्र ज्यांचा वशिला आहे ते असा सेवाकाल पुर्ण झाला नसतानाही पात्र समजून तृतीय श्रेणीत जाणार आहेत.
युनियनचे अध्यक्ष बापू पवार व सरचिटणीस चंद्रकांत शितोळे यांनी याबाबत आयुक्त सौरव राव यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी या सर्व प्रक्रियेची माहिती दिली असून संबधित खातेप्रमुखांना आदेश देऊन पात्र उमेदवारांवर होत असलेला अन्याय त्वरीत दूर करण्याची मागणी केली आहे.