नृत्य करण्यास नकार दिल्याचे कारण : कोथरूडमध्ये दोन गटात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:26 AM2017-09-08T02:26:48+5:302017-09-08T02:26:59+5:30
गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचायला नकार दिल्यामुळे चौघांनी युवकाला कोयत्याने व लाकडी बांबूने मारहाण करण्याचा प्रकार घडला.
कोथरूड : गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये नाचायला नकार दिल्यामुळे चौघांनी युवकाला कोयत्याने व लाकडी बांबूने मारहाण करण्याचा प्रकार घडला. त्याचाच राग मनात धरून या युवकाने चौघांसह एका महिलेच्या हातावर हातोडी मारून टेम्पोची काच फोडली. कोथरूड येथील राऊतवाडी वस्ती येथील बालाजी चौकात मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला.
याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. कौस्तुभ शिंदे (वय १९, रा. केळेवाडी, कोथरूड) याने दिलेल्या तक्रारीवरून योगेश जगताप, बल्ली, गोप्या, सोन्या (पूर्ण नावे पत्ता माहित नाही) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर सुरेश वाजे (वय १९, रा. राऊतवाडी, कोथरूड) याने दिलेल्या तक्रारीवरून विशाल गोणते, कौस्तुभ शिंदे, गणेश राठोड आणि आणखी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाजे हा मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास शिंदे यांच्या बालाजी मित्र मंडळापासून जात होता. त्यावेळी वाजे याच्या मंडळाची मिरवणूक सुरू होती.
भांडणे सुरू असताना शिंदे याच्या आईने मध्यस्थी करून ती सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बल्ली याने शिंदेच्या पायावर कोयत्याने मारले तर, जगतापने शिंदेच्या आईच्या हातावर हातोडा मारला. त्यानंतर गोप्या
आणि सोन्याने मिरवणुकीसाठी लावलेल्या जनरेटरच्या टेम्पोची काच बांबूने फोडली आणि पळून गेले. कोथरूड पोलीस पुढील तपास
करत आहेत.