विद्यार्थ्यांना मिळेना प्रवेश , प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:31 AM2017-09-02T01:31:30+5:302017-09-02T01:31:46+5:30
बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात
पुणे : बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यात अडचणी येत आहेत. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्याचे कारण सांगून महाविद्यालयांकडून या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात असल्याची तक्रार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे केली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने मागील आठवड्यात इयत्ता बारावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्य शासनाच्या निर्णयानुसार या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळू शकतो. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण व एटीकेटी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची प्रक्रिया केंद्रीय समितीकडून सुरू आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत नाही. मात्र, प्रथम वर्षाचे प्रवेश महाविद्यालय पातळीवर होतात. या महाविद्यालयांवरील प्रवेशप्रक्रियेवर विद्यापीठाचे नियंत्रण नसते. त्यामुळे सध्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नेमक्या महाविद्यालयात रिक्त जागा आहेत, याची माहिती कुठेही एकत्रित उपलब्ध होत नाही. परिणामी, त्यांना प्रत्येक महाविद्यालयात जाऊन याबाबत विचारणा करावी लागत आहे.
काही विद्यार्थी महाविद्यालयात गेल्यानंतर त्यांना प्रवेशप्रक्रिया संपल्याचे कारण दिले जात आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास पुरवणी परीक्षा जुलै महिन्यात घेण्याला काहीच अर्थ राहणार नाही, अशी नाराजी विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषी परदेशी यांनी शुक्रवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतली व त्यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे.