पक्षी अभयारण्यातच 'या'मुळे पक्ष्यांच्या आरोग्याला होतोय धोका निर्माण; पुणे महापालिकेचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 11:52 AM2020-11-09T11:52:54+5:302020-11-09T12:10:45+5:30
पक्षी सप्ताह विशेष : गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्त्यावर मुठा नदीकाठी बंडगार्डन परिसरात डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे.
पुणे : ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ आणि भारताचे बर्ड मॅन डॉ. सालिम अली यांनी पुण्याला भेट दिली तेव्हा ते आताच्या डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्यात गेले होते. त्यांनीच इथे अभयारण्य करण्याचे सूचवले होते. तसे पक्षीप्रेमींनी त्या जागेला त्यांचे नाव दिले. पण सरकार दरबारी मात्र या अभयारण्याला अजून मान्यता मिळालेली नाही. या पक्षी सप्ताहानिमित्त तरी महापालिकेने त्याचा विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नगर रस्त्यावर मुठा नदीकाठी बंडगार्डन परिसरात डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्य आहे. त्या ठिकाणी दरवर्षी परदेशातून अनेक पक्षी स्थलांतरीत होऊन येतात. येथे पक्ष्यांच्या सुमारे ११० प्रजाती दिसून येतात. ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ प्रकाश गोळे यांनी इतर पक्षीप्रेमींसोबत अभयारण्याची मुहूर्तमेढ रोवली होती.
या ठिकाणी मात्र नागरिक आणि महापालिका यांचे दुर्लक्ष होत आहे. अभयारण्याच्या परिसरात काही अज्ञात कचरा आणून टाकत आहेत. तसेच तो जाळत आहेत. त्याचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे. कारण पक्ष्यांसाठी तो धूर धोकादायक ठरतो. त्यांना त्यापासून आजार होण्याचा धोका आहे. या विषयी पक्षीप्रेमींनी तक्रार दिलेली आहे, पण त्यावर काहीच कारवाई झालेली नाही.
अभयारण्य संरक्षित व्हावे ;नागरिकांनी दबाव गट करावा
पुणे शहरातील पक्ष्यांचे हे एक वैभवशाली पक्षी निरीक्षण केंद्र आहे. हे ठिकाणी किमान संरक्षित करण्याची सूचना महापालिकेला केली होती. पण त्यावरही काही झालेले नाही. नागरिकांनीच आता यासाठी दबाव गट तयार केला पाहिजे.
.................
पक्षी अभयारण्याला महापालिकेने मान्यता द्यावी, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. खरंतर पुण्यातील लहान-थोरांसाठी पक्षी निरीक्षण करण्यासाठी अतिशय उत्तम ठिकाण आहे. त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.
- धर्मराज पाटील, वन्यजीव अभ्यासक