टोमॅटो आगाराचे अर्थकारण कोलमडले
By admin | Published: September 4, 2016 04:07 AM2016-09-04T04:07:52+5:302016-09-04T04:07:52+5:30
पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे
- बी. एम. काळे , जेजुरी
पुरंदर तालुक्यात बेलसर पंचक्रोशीला ‘टोमॅटोचे आगार’ म्हणून संबोधले जाते. यंदाही मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड झाली आहे; मात्र बाजारभावाच कोसळल्याने येथील टोमॅटो उत्पादकांचे अर्थकारण पूर्णपणे कोसळले आहे. येथे भरणाऱ्या बाजारावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असल्याचे शेतकरीवर्गाचे म्हणणे आहे.
दररोज सकाळी स्थानिक शेतकरी, व्यापारी येथील बेलसर ग्रामपंचायतीसमोर एकत्र येतात. एकत्र बसून मुंबई, पुणे आदी भागातील बाजारभाव विचारून इथला खरेदीचा बाजार ठरतो. व्यापारी माल खरेदी करून शेतकऱ्याला ठोक रक्कम देऊन व्यवहार पूर्ण करतात.
सगळीकडेच बाजारभाव कोसळल्याने इथल्याही बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे. एकरी लाख-दीड लाख खर्च करून उत्पन्न मात्र निम्मेही होणार नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच कोलमडले आहे. या बाजारामुळे किमान खर्च तरी निघणार असल्याने शेतकरी बाजारात टोमॅटोची विक्री करीत आहेत.
बेलसर परिसरात एक एकरापासून ते सात-आठ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली आहे. सुमारे पाचशे एकरापेक्षा जास्त क्षेत्रावर १०५७, अक्षय, जेके ८११, आणि रसिका या जातीच्या टोमॅटोची लागवड झालेली आहे. गेल्या महिनाभरापासून येथे व्यापारी टोमॅटोच्या खरेदीसाठी ठाण मांडून बसलेले आहेत; मात्र बाजारभाव उठत नसल्याने शेतकरीवर्गात मोठी चिंता आहे. दररोज ठरणाऱ्या बाजारभावाच्या वेळी शेतकरी व व्यापाऱ्यांत चांगलीच चकमक झडत आहे; मात्र दोघांना ही गरज असल्याने तोडगाही निघत असल्याने बाजार सुरळीत पार पडत आहे.
पुणे-मुंबईच्या बाजारपेठेत टोमॅटोचे कॅरेट पाठविले, तर सर्व खर्च वजा जाता २५ किंवा ३० किलोंच्या कॅरेटला ५० ते ६० रुपयेच हातात येत असल्याने नाराजी आहे. येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी मामा गरूड, बाळासाहेब जगताप, सुनील गरूड, लक्षमण जगताप, प्रकाश बुधे, बंडू जगताप, बाळू बुधे, कैलास बनकर, नितीन गरूड, बाळासाहेब झगडे,चंद्रकांत लडकत यांनी मात्र यंदा टोमॅटो उत्पादक चांगलेच अडचणीत आले असल्याचे म्हटले आहे. इथे दररोज भरणाऱ्या बाजारावरच भवितव्य अवलंबून असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
हवामान खात्याने या वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याचे जाहीर केल्याने या वर्षी टोमॅटोला चांगला बाजारभाव राहील अशी खात्री वाटल्यानेच शेतकऱ्यांनी बेलसर, वाळुंज, निळुंज, साकुर्डे, कोथळे, भोसलेवाडी, राणमळा, धालेवाडी, पारगाव आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. या संपूर्ण परिसरात एक हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झालेली आहे; मात्र हवामान खात्याचा अंदाज फोल ठरल्याने सर्वत्रच टोमॅटोची पिके जोरदार आल्याने बाजारभावावर मोठा परिणाम झाला आहे.