भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन सदस्यांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 06:51 PM2021-04-17T18:51:44+5:302021-04-17T19:01:00+5:30

भोर पंचायत समितीच्या सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांची राष्ट्रवादी पक्षातुन हकालपट्टी 

Rebellion in Bhor Panchayat Samiti chairperson election, suspension of two members from NCP | भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन सदस्यांची हकालपट्टी

भोर पंचायत समिती सभापती निवडणुकीत बंडखोरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून दोन सदस्यांची हकालपट्टी

googlenewsNext

इंदापूर: पुणे जिल्ह्यातील भोर पंचायत समितीच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन सदस्यांनी बंडखोरी करत अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल करत  होता. या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारालाच पराभव स्वीकारावा लागला होता. याचे तीव्र पडसाद स्थानिक राजकारणात उमटले होते. मात्र आता पक्ष शिस्तीचा भंग केल्याप्रकरणी संबंधित दोन सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

भोर सभापतीपदाची निवडणुक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी झाली होती. या निवडणुकीआधी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ( दि. १६  फेब्रुवारी ) रोजीच्या सभापती निवडीच्या विषयावरती भाटघर रेस्ट हाऊस येथे आयोजित केली होती. त्याला उपस्थित न राहिल्याने व बंडखोरी करत पक्षशिस्तीचा भंग केल्याने सभापती दमयंती जाधव व  माजी सभापती श्रीधर किंद्रे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी शनिवारी ( दि.१७ ) इंदापूर येथे  प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिली आहे.

या पत्रकात गारटकर म्हणतात, दोन्ही सदस्यांना पक्षाच्या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु सदर बैठकीस हे दोघेही अनुपस्थित होते. सदर बैठकीमध्ये भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुखांनी एकमेव मागणी अर्ज केलेले पंचायत समिती सदस्य लहू शेलार यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित केले होते.त्याप्रमाणे लहू शेलार यांच्या नावे पक्षाचा व्हीप तयार करुन ( दि. १८ ) फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पंचायत समिती सदस्यांना तालुका अध्यक्ष घोरपडे यांनी बजावला. त्यावर सर्व सदस्यांनी व्हीप स्वीकारल्याच्या सह्या केल्या.

भोर पंचायत समितीमध्ये ६ सदस्यांपैकी ४ सदस्य राष्ट्रवादी, १ सदस्य काँग्रेस व १ सदस्य शिवसेना असे पक्षीय बलाबल असताना प्रत्यक्ष सभापती निवडीच्यावेळी दमयंती जाधव यांनी पक्ष आदेशाविरुद्ध पाऊल उचलत बंडखोरी करून सभापती पदासाठी अर्ज भरला आणि त्यांना सूचक म्हणून श्रीधर किंद्रे यांनी पाठिंबा दिला. ऐनवेळी घडलेल्या या प्रकारामुळे सभापतीपदाचे पक्षाचे अधिकृत उमेदवार लहू शेलार व श्रीमती मंगलाताई बोडके यांनी पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून नाईलाजास्तव दमयंती जाधव यांना मतदान केले.

या चारही सदस्यांना झालेल्या प्रकाराबद्दल खुलासा मागितला असता सभापती दमयंती जाधव व माजी सभापती श्रीधर किंद्रे यांचा खुलासा योग्य व समाधानकारक वाटला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी केलेली ही कृती पक्षाच्या हितास बाधा पोहोचविणारी आणि पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे असे आमचे मत झाले आहे. या कारणास्तव दमयंती जाधव व श्रीधर किंद्रे या दोघांची पक्षातून हकालपट्टी करीत आहोत,असे गारटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. 

यापुढे वरील दोन्ही सदस्यांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राजकीय संबंध ठेवू नयेत अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांनी दिली आहे.

Web Title: Rebellion in Bhor Panchayat Samiti chairperson election, suspension of two members from NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.