इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 09:55 PM2024-10-07T21:55:48+5:302024-10-07T21:58:17+5:30

नाराज झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातून बंडखोरीची घोषणा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Rebellion inevitable in Indapur Big announcement by Sharad Pawars NCP leaders after harshwardhan Patils entry | इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा

इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा

Indapur NCP ( Marathi News ) : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या विधानसभेसाठी इंदापुरातून हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारीही जाहीर करून टाकली. पक्षाच्या या निर्णयानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे इंदापुरातील इतर नेते नाराज झाले असून या नाराज नेत्यांनी आज पत्रकार परिषद घेत बंडाचं निशाण फडकावलं आहे. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे आणि भरतशेठ शाह यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत आम्ही ११ तारखेला कार्यकर्ता मेळावा आयोजित करत असल्याची घोषणा केली आहे.

"लोकसभा निवडणुकीत आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे सुप्रिया सुळे यांचं काम केलं. मात्र आता अचानक पक्षाने बाहेरून उमेदवार आयात केला आहे. यामुळे आमच्यावर मोठा अन्याय झाला असून तालुक्यातील जनतेतही मोठा उद्रेक होणार आहे. त्यामुळे आम्ही आता हा चेंडू जनतेचा न्यायालयात टाकणार असून ११ तारखेला मार्केट कमिटीच्या मैदानात कार्यकर्ता मेळावा घेणार आहोत. या माध्यमातून तालुक्यातील जनतेला तिसरा पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे," अशी भूमिका यावेळी प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे यांनी मांडली आहे.

"शरद पवारसाहेबांनी जरी हर्षवर्धन पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी यापूर्वीही अनेकदा अशा उमेदवाऱ्या मागे घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे पाटील यांची उमेदवारी मागे घ्यावी," अशी मागणी यावेळी जगदाळे यांनी केली आहे.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांच्या एंट्रीमुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या  स्थानिक नेत्यांकडून ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यातून बंडखोरीची घोषणा होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

जयंत पाटलांकडून हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

"आजच्या प्रवेशाच्या कार्यक्रमातील उपस्थिती पाहून इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झालंय. महाराष्ट्र लढणाऱ्या माणसांच्या मागे उभा राहतो. दिल्लीश्वरांनी शरद पवारांना मोडण्याचे प्रयत्न केले,  ईडीची नोटीस पण पाठवली, पण शरद पवारांनी मराठी स्वाभिमान दाखवला. इंदापूरचे हे महाधनुष्य हर्षवर्धन पाटील आपल्या पक्षात आल्यामुळे आपल्यासाठी सोपे झाले. हे महाधनुष्य त्यांनी आपल्या हाती घ्यावं," असं म्हणत जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले.
 

Web Title: Rebellion inevitable in Indapur Big announcement by Sharad Pawars NCP leaders after harshwardhan Patils entry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.