व्यवस्थेविरोधातील बंडखोर लेखिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 05:13 AM2018-09-28T05:13:54+5:302018-09-28T05:14:41+5:30

कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ अशा दोन कादंबऱ्या. एका लेखकाच्या नव्हे; तर कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून त्यांचा संपूर्ण लेखनप्रवास सुरू होता. संशोधनवृत्ती हा त्यांचा लेखनाचा गाभा होता.

Rebellious Writer Against System | व्यवस्थेविरोधातील बंडखोर लेखिका

व्यवस्थेविरोधातील बंडखोर लेखिका

googlenewsNext

पुणे - कविता महाजन हे नाव उच्चारल्यानंतर डोळ्यासमोर येतात त्या त्यांच्या बंडखोर लेखणीमधून उतरलेल्या ‘ब्र’ आणि ‘भिन्न’ अशा दोन कादंबऱ्या. एका लेखकाच्या नव्हे; तर कार्यकर्त्याच्या भूमिकेमधून त्यांचा संपूर्ण लेखनप्रवास सुरू होता. संशोधनवृत्ती हा त्यांचा लेखनाचा गाभा होता.
आदिवासी भागातल्या अनुभवांचा इतिवृत्तांत, त्यासोबत स्वयंसेवी संस्थांसह स्त्री-पुरुष संबंधांमधलं राजकारणदेखील त्यांनी ‘ब्र’ मध्ये हळूवारपणे उलगडलं. ‘ब्र’ नंतर ‘भिन्न’ कादंबरीही एका सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतूनच त्यांनी जगासमोर आणली. एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हणून जन्माला आलेली मुले, त्यांना जन्म देऊन तरुण वयात मृत्युमुखी पडलेल्या मुली, त्यांच्या यातना हे सगळं जग, छळ, फसवणूक, नात्यांवरचा, माणसांवरचा उडवणारा विश्वास त्यांनी जवळून अनुभवला होता. टाटा समाजविज्ञान संस्थेसाठी विदर्भातल्या आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या विधवांची सद्य:स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी एक अभ्यासदौराही त्यांनी केला. जवळपास आठ महिने विदर्भात राहून त्यांनी मृत्यू, ताण, आत्महत्या झालेल्या त्या घरातल्या लहान वयाच्या मुलांच्या मनावर झालेला विपरित परिणाम पाहिला.
या दोन कादंबºयांमुळे त्या चर्चेत आल्या असल्या, तरी त्यांच्या लेखनाची बीजं ही कवितांपासून रूजली. ‘तत्पुरुष’, ‘धुळीचा आवाज’ यासारख्या कवितासंग्रहांतील त्यांच्या कविता ‘अनुष्टुभ’, ‘कवितारती’, ‘मिळून साºयाजणी’सारख्या प्रथितयश नियतकालिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कविता वाचून ना. धों. महानोर, इंदिरा संत, शंकर-सरोजिनी वैद्य, प्रभा गणोरकर अशा अनेक दिग्गजांची त्यांना दादही मिळाली होती. त्यांच्या धारदार लेखणीतून कागदावर उतरलेल्या कवितांमुळे स्त्रीवादाचा ठपका त्यांच्यावर बसला खरा; मात्र त्यांच्या कवितांमध्ये एका संवेदनशील आणि तरल मनाचे दर्शनही नकळतपणे घडले. ‘वारली लोकगीताचं’ संपादन, ‘भारतीय लेखिका’ हा देशभरातील लेखिकांचे प्रतिबिंब दाखविणारा ग्रंथ हे त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूचेच दर्शन घडवितात. एक बंडखोर लेखिका अशी त्यांची ओळ्ख असली तरी लहान मुलांसाठी त्यांनी केलेले लेखन हे त्यांच्या एका मातृत्वाचे पैलू उलगडून दाखविते. ‘बकरीचं पिल्लू: जंगल गोष्टी पाच पुस्तकांचा संग्रह, जोयानाचे रंग या पस्तके बच्चे कंपनीच्या पसंतीस उतरली.

मल्टिमीडिया कादंबरीचा प्रयोग

चित्रं, कॅलिग्राफी, फोटोग्राफी, अ‍ॅनिमेशन, संगीत अशी विविध माध्यमांचा वापर करून त्यांनी लिहिलेली ‘कुहू’ ही मल्टिमीडिया कादंबरी हा भारतीय साहित्य विश्वातील आगळावेगळा प्रयोग ठरला. लोकमतसाठी त्यांनी वेळोवेळी विपुल लेखन केले.
या लेखनकारकीर्दीमध्ये त्या अनेक पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या. रजई या इस्मत चुगताई यांच्या लघुकथांच्या अनुवादाला साहित्य अकादमीचा भाषांतरसाठीचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, कवयित्री बहिणाबाई पुरस्कार याच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.

संवेदना ई-मेलवर पाठवाव्यात

फुफ्फुसात जंतूसंसर्ग झाल्याने कविता महाजन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते परंतु तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्या कायदेशीर मृत्यूपत्रातील इच्छेनुसार व्हेंटिलेटर काढण्यात आला. त्यांच्यावर कोणतेही धार्मिक अंतिम संस्कार केले जाणार नाहीत. मृत्युपश्चात कुठलाही समारंभ, कार्यक्रम तसेच पुरस्कार प्रदान करु नयेत. संवेदना ई मेलवर पाठवाव्यात, अशी त्यांची मुलगी दिशा महाजन यांनी कळविले आहे.

Web Title: Rebellious Writer Against System

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.