गोसावीवस्तीवर पुन्हा दरोडेखोरांचा धुमाकूळ
By admin | Published: December 25, 2014 04:55 AM2014-12-25T04:55:41+5:302014-12-25T04:55:41+5:30
कन्हेरी (ता. बारामती) येथे मागील आठवड्यात चव्हाणवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती आज झाली
बारामती/काटेवाडी : कन्हेरी (ता. बारामती) येथे मागील आठवड्यात चव्हाणवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. त्याची पुनरावृत्ती आज झाली. कन्हेरी व पिंपळी गावदरम्यान असलेल्या गोसावी वस्तीवर आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास १० ते १२ दरोडेखोरांनी राजेंद्र गोसावी यांची घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, घरातील तरुणांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे दरोडेखोर तेथून पळून गेले. जाताना घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून गेल्याचे सांगण्यात आले. जाताना रोख रक्कम, मोबाईल, दीड तोळ्याचे गंठण, असा ऐवज लुटून नेला.
या घटनेनंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, पोलीस पथक घटनास्थळी गेले. मागील आठवड्यात चोरट्यांनी चव्हाणवस्तीवर धुमाकूळ घातला होता. घरातील सर्व ऐवज लुबाडून नेला होता. तसेच, धारदार वस्तूंनी घरातील लोकांवर हल्ला केला होता. त्या भीतीमुळे परिसरातील शेतकरी कुटुंब गावातील घरांमध्ये वास्तव्यासाठी गेले आहेत. आज कन्हेरीच्या गावातीलच राजेंद्र गोसावी यांच्या वस्तीच्या घरावर १० ते १२ दरोडेखोरांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दगडफेकीला सुरुवात केली.
चव्हाणवस्तीवरील हल्ल्यानंतर गोसावी यांचे सर्व कुटुंब गावात राहण्यासाठी गेले आहेत. परंतु, वस्तीवर पाळीव जनावरे असल्यामुळे किरण गोसावी, वैभव गोसावी हे दोघे बंधू घरात होते. दरोडेखोरांनी घराभोवती वेढा टाकला होता. त्यातून प्रसंगावधान राखून दरोडेखोरांच्या तावडीने दोघे गावाच्या दिशेने पळाले. तरीदेखील दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून हातातील काठ्या फेकून मारल्या. त्यांचा हल्ला चुकवत दोघे गावापर्यंत पोहोचले. वडिलांना त्यांनी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस पाटील शंकर काळे यांना कळविले. काळे यांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यापूर्वी दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला होता. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकले होते. त्याचबरोबर १० हजार रुपये रोख, दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, मोबाईल त्यांनी या दरम्यान चोरून नेला.
या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी कदम यांनी सांगितले, की १० ते १५ जणांच्या टोळक्याने हा हल्ला या वस्तीवर केला. तरुण जखमी झाला आहे. (वार्ताहर)