वॉटरपु्रफिंगच्या नावाखाली पुनर्बांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 02:10 AM2018-11-12T02:10:30+5:302018-11-12T02:10:44+5:30
भुसार विभागातील गाळे : अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या गुलटेकडी मार्केट यार्डात भुसार विभागात वॉटरप्रुफिंगच्या नावाखाली अनधिकृतपणे गाळ्यांची पुनर्बांधणी सुरू आहे. सध्या या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला आहे. परंतु बाजार समिती प्रशासनाकडून जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या बांधकामासाठी संबंधित बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घेतलेली नाही. बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंधामुळे अशा अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये सुरू आहे.
मार्केट यार्डात गूळ-भुसार विभागात सध्या अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. किरकोळ दुरुस्त्यांच्या नावाखाली काही व्यापारी अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकामे करत आहेत.
गूळ-भुसार विभागात गाळा नं. १९९, २०० आणि २०१ येथील पूर्वीचा गाळा पाडून त्या ठिकाणी नव्याने गाळ्याची उभारणी सुरू आहे. गाळा पुनर्बांधणीसाठी बाजार समितीसह महापालिकेची परवानगी आवश्यक असते. मात्र, बाजार समितीकडून वॉटरप्रुफिंग परवानगीच्या नावाखाली संबंधित व्यापाºयांनी नव्याने गाळा बांधकाम काढले आहे. सध्या या बांधकामाचा एक स्लॅब पूर्ण झाला तरीही बाजार समिती प्रशासनाला जाग आलेली नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाला बाजार समिती प्रशासन पाठीशी घालत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, संबंधित बांधकामाची पाहणी करून त्या बांधकामास परवानगी आहे का नाही, याची पडताळणी करून पुढील कार्यवाही करू, असे स्पष्ट केले.
विभागप्रमुखाचे दुर्लक्ष
गुलटेकडी मार्केट यार्डात गूळ-भुसार, भाजीपाला, फळे, फुले, कांदा-बटाटा, पानबाजार आदी विभाग आहेत. संबंधित सर्व विभागांना विभागप्रमुख नेमण्यात आले आहेत. आपल्या विभागातील दैनंदिन कामकाजासह अनधिकृत बांधकामांची माहिती अतिक्रमण विभाग आणि समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यावर कारवाईची जबाबादारी संबंधित विभागप्रमुखांची असते. मात्र, गूळ-भुसार विभागात अनधिकृत बांधकामे सुरू असतानाही त्याकडे संबंधित विभागाप्रमुखांचे दुर्लक्ष असल्याचे समोर आले आहे.