‘ती’ पावती यवत पोलीस ठाण्याचीच
By admin | Published: February 27, 2015 11:45 PM2015-02-27T23:45:35+5:302015-02-27T23:45:35+5:30
बेकायदा प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी संबंधित वाहनचालकावर यवत पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून पावती दिली; मात्र त्यावरील शिक्का मंचर
यवत : बेकायदा प्रवासी वाहतूक केल्या प्रकरणी संबंधित वाहनचालकावर यवत पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून पावती दिली; मात्र त्यावरील शिक्का मंचर पोलीस ठाण्याचा असल्याने खळबळ उडाली आहे. ती पावती यवत पोलीस ठाण्याची असून या प्रकरणी चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई करणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भांडगाव (ता. दौंड) येथील वाहनचालक महंमद जब्बार शेख यांना ती पावती देण्यात आली आहे. शेख यांनी त्यांची गाडी भरत असताना दुसऱ्या वाहनाच्या चालकाबरोबर भांडण झाले. याची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत गेली होती. शेख यांच्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करीत असेल, याबाबत दंडात्मक कारवाई केली. त्यांना दोन हजार रुपये दंड करण्यात आला होता.
परंतु यवत पोलिसांनी दिलेल्या पावतीवर मंचर पोलीस ठाण्याचा शिक्का असल्याची बाब शेख यांच्या लक्षात आली. याची कुणकुण सर्व प्रवासी वाहनचालकांनादेखील लागली होती. यामुळे यात नेमकी चूक कोणाची की पावती बोगस आहे? याबाबत पोलीस ठाण्यामध्ये खळबळ सुरू होती. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी पावतीच्या अनुक्रमांकावरून या पावतीशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले होते.
यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी आज या घटनेबाबत पत्रकारांना माहिती देत असताना ती पावती यवत पोलीस ठाण्याचीच असल्याचे मान्य केले; तर पोलिसांकडे असलेल्या पावतीवर असा शिक्का नाही; मात्र वाहनचालकाच्या पावतीवर मंचर पोलिस ठाण्याचा शिक्का आलाच कसा, याची चौकशी आम्ही सुरू केली असून दोषी व्यक्तीवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली. (वार्ताहर)