प्रस्ताव दाखल करूनही टँकर मिळेना
By admin | Published: April 15, 2016 03:35 AM2016-04-15T03:35:49+5:302016-04-15T03:35:49+5:30
जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. डिंभे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने टंचाईपासून दिलासा मिळाला असला तरी आजही जिल्ह्यात अनेक भागांत नागरिकांना
पुणे : जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. डिंभे धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने टंचाईपासून दिलासा मिळाला असला तरी आजही जिल्ह्यात अनेक भागांत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवले जात आहे. अनेक तालुक्यांनी तहसील तसेच प्रांत कार्यालयात टँकरचे प्रस्ताव दाखल केले आहे. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळत नसल्याने टँकर सुरू होऊ शकले नाही. यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. यामुळे डिंभे धरणातून पिण्यासाठी कालव्याला पाणी सोडण्यात आले. यामुळे काहीसा दिलासा जरी मिळाला असला, तरी जिल्ह्याच्या अनेक भागांत पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पायपीट थांबावी यासाठी तहसील कार्यालयात टँकरचा प्रस्ताव दाखल होत आहे. टँकर मंजुरीचे सर्व अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना असल्यामुळे या प्रस्तावांना मंजुरी मिळण्यास विलंब लागत आहे. पुरंदर, बारामती, दौंड, भोर तालुक्यांतून टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयात गेले आहे. दौंड तालुक्यात २० टँकरचे प्रस्ताव होते. हे सर्व प्रस्ताव मंजूर झाले आहे.
इंदापूर तालुक्यातील १७ गावे आणि वाड्यांनाही २० टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे. जवळपास १९ हजार २६३ अशा ५३ हजार ३६७ ग्रामस्थ या पाण्यावर अवलंबून आहे. आणखी ९ गावांचे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील गावांत तीव्र पाणीटंचाई झाली असून, १२ गावे व २२ वाड्यावस्त्यांनी टँकरचे प्रस्ताव भोर पंचायत समितीकडे सादर केले आहेत. त्यापैकी फ क्त तीन गावे व चार वाड्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. यापैकी एकाही टँकरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. दोन्ही धरणभागात, महुडे आणि विसगाव खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई सुरूअसून, त्वरित टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. जुन्नर तालुक्यातील ५ गावे व ६६ वाड्यावस्त्यांना ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दिली. तर पुरंदर तालुक्यातील २ गावठाणे व ९६ वाड्यावस्त्यांवरील सुमारे २३ हजार ४०२ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
खेड तालुक्यात मागण्यांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. कनेरसर, साबुर्डी, वाशेरे, वेताळे, आव्हाट, कुरकुंडी या गावांच्या वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव खेड पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत.
गेल्या वर्षी शासकीय ५ आणि खासगी २ अशा ७ टँकरने या वाड्यावस्त्यांना पाणी पुरविले होते. हे टँकर गेल्या वर्षी १० मेनंतर सुरू झाले होते. पंचायत समितीने वाशेरे, साबुर्डी आणि जऊळके खुर्दसाठी तहसीलदारांकडे प्रस्ताव दिले आहेत.
टँकरपुढे पाण्याचा प्रश्न
दौंड तालुक्यात २० टँकर सुरू आहेत; परंतु या २० टँकरला पाणी भरायचे कोठून? असाही प्रश्न निर्माण होत असल्याने टँकरग्रस्त काही गावांत टॅँकर असूनदेखील पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. दरम्यान, काही सेवाभावी संस्था खासगी विहिरीतून काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करत असल्याची वस्तुस्थिती आहे.
पाणीपुरवठा सुरळीत
खोर आणि परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी टँकरने सुरळीतपणे पाणीपुरवठा सुरू आहे. वरवंड तलावातून पाणी पिंपळाचीवाडी येथील टाकीत घेतले जाते. त्या टाकीतील पाणीपुरवठा टँकरद्वारे परिसराला होत आहे.
- रामचंद्र चौधरी
सरपंच, खोर