बारामती एमआयडीसीत मंदीचे वातावरण
By Admin | Published: December 26, 2016 02:25 AM2016-12-26T02:25:48+5:302016-12-26T02:25:48+5:30
मागील दोन वर्षांपासून औद्योगिक वसाहतींमध्ये मंदीचे वातावरण आहे. त्यातच नोटाबंदीच्या निर्णयामुळे भर पडली आहे.
बारामती : मागील दोन वर्षांपासून औद्योगिक वसाहतींमध्ये मंदीचे वातावरण आहे. त्यातच नोटाबंदीच्या निर्णयामुळे भर पडली आहे. त्याचा परिणाम लघुउद्योजकांना देखील सोसावा लागत आहे. त्याचबरोबर कामगारांना फटका बसला आहे. वाहतूक, ठेकेदारी, सुटे भाग निर्मिती उद्योगांना या मंदीची तीव्र झळ बसली आहे. या मंदीमुळे उद्योग क्षेत्रात कमालीचे चिंतेचे वातावरण आहे.
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे अध्यक्ष प्रमोद काकडे यांनी सांगितले, की एमआयडीसीमध्ये सध्या बड्या उद्योगांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. बाजारपेठेतील मंदीमुळे कोणत्याही उत्पादनांना उठाव नाही. त्यामुळे उद्योग बंद ठेवण्याची वेळ आली आहे. स्थानिक उद्योग डबघाईला आले आहेत. कोणत्याही उत्पादनांना मागणी नाही. उद्योगांमधील कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मात्र, वीजबिल, एमआयडीसी पाणी बिल, कर्ज हप्ते आदी खर्च थांबलेले नाहीत. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांची धडपड सुरू आहे. परिस्थिती पूर्ववत होण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
बारामती इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनी सांगितले, की गेल्या दोन वर्षांपासून बाजारपेठेत, औद्योगिक क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. त्यामध्ये वाढच होताना दिसून येत आहे. त्यातच नोटाबंदीच्या निर्णयाचा या मंदीवर आणखी परिणाम जाणवत आहे. औद्योगिक क्षेत्रात शुकशुकाट दिसून येत आहे. बड्या उद्योगांची उलाढाल ठप्प झाली आहे.
भारतीय कामगार सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य भारत जाधव यांनी सांगितले, की हंगामी तसेच कंत्राटी क ामगारांवर या निर्णयातून आलेल्या मंदीमुळे कुऱ्हाड कोसळली आहे. या कामगारांना मिळेल तिथे काम शोधावे लागत आहे. कंपन्यामधील हंगामी कामगारांचा रोजगार थांबला आहे. मिळालेल्या पगाराएवढे देखील पैसे बँकेत मिळत नाही. त्यासाठी कामगार कामाला दांड्या मारून बँकेतील रांगामध्ये थांबत आहेत. बँकेतून मिळालेले पैसे अपूर्ण असतात. त्या तुटपुंज्या पैशांमध्ये किराणा माल, पेट्रोल, दूध, घरभाडे, वीजबिल, दवाखाना, शालेय खर्च कसा भागविणार.
कंपन्या बंद ठेवाव्या लागत असल्याने कंपनीचेही मोठे नुकसान होत आहे. आगामी काळात परिस्थितीमध्ये बदल न झाल्यास मोठ्या समस्येला सामारे जावे लागेल. कंपन्यांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. यातून मार्ग कसा काढणार, हाच प्रश्न कामगार वर्गाला सतावत आहे. (प्रतिनिधी)
असंघटित कामगारांना त्रास
येथील स्थानिक कंपनी रिप्रेझेंटेटीव्ह फिरोज सय्यद यांनी असंघटीत कामगार वर्ग अडचणीत आल्याचे सांगितले. कामगारांमध्ये सध्या पाचशे व एक हजाराच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे असुरक्षिततेचे वातावरण तयार झाले आहे. बँकांमध्ये होणाऱ्या भरण्यानुसार पैसे देण्यात येतात. मिळणारी रक्कम तुटपुंजी असते. कॅशलेस व्यवहाराबाबत सुरक्षित व्यवहाराची खात्री कामगार वर्गाला नसल्याचे चित्र आहे.
अन्नप्रक्रिया उद्योगांवर परिणाम...आगामी काळात गंभीर परिस्थिती...
बारामती चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे कार्याध्यक्ष दत्ता कुंभार यांनी सांगितले, वाहन, अन्नप्रक्रिया, वाईन उद्योगावर याचा विपरित परिणाम झाला आहे. मोठ्या कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. एका महिन्यात १० ते १२ दिवस या कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा स्थानिक उद्योगाला चांगलाच फटका बसला आहे. येथील कामगारांच्या रोजगाराचाप्रश्न निर्माण झाला आहे. या स्थितीत उद्योजकांकडे आर्थिक प्रश्न बिकट झाला आहे. कर्ज हफ्ता भरणे मुश्कील होणार आहे. त्यासाठी बँका, महावितरण, एमआयडीसीने सहकार्याची भूमिका घ्यावी. अन्यथा उद्योग मोडकळीस येण्याची भीती आहे.
कामगार नेते तानाजी खराडे यांनी सांगितले, की नोटाबंदीच्या निर्णयामुळे बाजारपेठेमुळे बाजारपेठेवर विपरित परिणाम झाला आहे. त्यातून कंपन्यांच्या उत्पादन विक्रीमध्ये घट झाली आहे. परिणामी कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. ठेकेदारीवरील, तात्पुरत्या कामगारांच्या वेतनामध्ये कपात करावी लागत आहे. या कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती आहे. कायम कामगारांना सध्या शिल्लक रजा आणि कंपनीच्या सहकार्यातून तात्पुरता पर्याय काढला आहे. मात्र, परिस्थिती न सुधारल्यास आगामी काळात कायम कामगारांसमोरहीप्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. कामगार वर्गावर मोठे संकट ओढवले आहे. शासनाने यावर तातडीची उपाययोजना करावी, ठोस निर्णय घ्यावा. औद्योगिक क्षेत्रातील परिस्थिती बदलण्यासाठी नियोजन करावे.