मंदीतही आरटीओची झाली चांदी
By admin | Published: October 23, 2015 03:34 AM2015-10-23T03:34:03+5:302015-10-23T03:34:03+5:30
बाजारपेठेत असलेल्या मंदीच्या वातावरणामुळे त्याचा फटका नवीन वाहन नोंदणीस बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, १९ ते २२ आॅक्टोबर २0१५ या चार दिवसांच्या कालावधीत
पुणे : बाजारपेठेत असलेल्या मंदीच्या वातावरणामुळे त्याचा फटका नवीन वाहन नोंदणीस बसण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, १९ ते २२ आॅक्टोबर २0१५ या चार दिवसांच्या कालावधीत तब्बल ३ हजार ७७३ नवीन वाहनांची नोंद झाली आहे. मागील वर्षी दसऱ्याच्या चार दिवसांच्या कालावधीत २ हजार ८९२ नवीन वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, आपली नवीन वाहने घेण्यासाठी शहरातील वाहनांच्या शोरूमबाहेर नागरिकांनी आज रांगा लावल्या होत्या.
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अनेक जण नवीन वाहन खरेदी करतात. मंदीच्या वातावरणामुळे तसेच राज्यावरील दुष्काळाच्या सावटामुळे या वर्षी गतवर्षीच्या तुलनेत नवीन वाहन नोंदणी कमी होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, प्रत्यक्षात मागील वर्षीपेक्षा ही नोंदणी २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे दिसून आले. या वर्षी एकूण ३ हजार ७७३ वाहनांची नोंद झाली असून, त्यात सर्वाधिक २५५३ दुचाकी आहेत, तर त्याखालोखाल चारचाकी वाहने असून, त्यांची संख्या १0९४ आहे. तर ७२ मालवाहू वाहणे असून, १३ प्रवासी बसेस तर ५४ टूरिस्ट टॅक्सी आहेत. तर अवघ्या ७ रिक्षा आहेत. दरम्यान, या वाहन नोंदणीमधून आरटीओला ४ लाख २५ हजार २२0 रुपयांचे नोंदणी शुल्क मिळाले आहे. तर करापोटी तब्बल ११ कोटी ५ लाख ६५ हजार ६७0 रुपयांचा महसूल मिळालेला आहे.
रिक्षा कमी चारचाकी अधिक
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी नवीन वाहनांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली आहे. तर, उत्पन्न दुपटीने वाढले आहे. मात्र, या वर्षी रिक्षांची संख्या कमालीची घटली असून, चारचाकी वाहनांची तसेच टूरिस्ट टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे ५९७ चारचाकी वाहनांची नोंद झाली होती. तर या वर्षी हा आकडा १0९४ वर पोहोचला आहे, तर मागील वर्षी ७७ रिक्षांची नोंदणी झाली होती. या वर्षी हा आकडा ७ वर पोहोचला आहे, तर दुसरीकडे प्रवासी बसेसची संख्या मागील वर्षी 88 जोती हा आकडा या वर्षी 13 वर पोहचला आहे. तर मालवाहू वाहनांची संख्याही मागील वर्षीच्या तुलनेत 25 टक्क्यांनी घटली आहे.