विदर्भाची ओळख असलेले चमचमीत तर्री पोहे करून तर बघा !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 03:29 PM2019-06-22T15:29:09+5:302019-06-22T15:41:16+5:30
विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव. याच चवीची परंपरा सांगणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. तुम्हाला मसालेदार, चमचमीत आणि तिखट खाण्याची आवड असेल तर हे पोहे तुमची आवडती डीश होऊ शकते. तेव्हा करायला विसरू नका नागपुरी तर्री पोहे.
पुणे : विदर्भ म्हटला की डोळ्यासमोर येतं ते वऱ्हाडी जेवण. हाशहुश्श करत खायला लावणारे मसाले आणि भन्नाट चव. याच चवीची परंपरा सांगणारा पदार्थ म्हणजे तर्री पोहे. तुम्हाला मसालेदार, चमचमीत आणि तिखट खाण्याची आवड असेल तर हे पोहे तुमची आवडती डीश होऊ शकते. तेव्हा करायला विसरू नका नागपुरी तर्री पोहे.
साहित्य :
- पोहे तीन वाट्या
- चणे (हरबरे भिजवलेले) एक वाटी
- बारीक ;चिरलेले कांदे दोन
- हिरव्या मिरच्या चार बारीक चिरून
- कोथिंबीर अर्धी वाटी
- बटाटे साल काढून चिरलेला मध्यमआकाराचा
- टोमॅटो बारीक चिरलेला एक
- वऱ्हाडी मसाला दोन चमचे (नसल्यास कांदा लसूण मसाला घ्या)
- लाल तिखट एक चमचा
- धने पावडर एक चमचा
- हळद अर्धा चमचा
- मोहरी-जिरे
- आलं- लसूण पेस्ट
- साखर अर्धा चमचा
- मीठ चवीपुरते
- शेव सजावटीसाठी
- तळलेले शेंगदाणे
- तेल अर्धी वाटी
तर्रीची कृती :
- चणे पाणी आणि मीठ घालून एक शिट्टी घेऊन उकडून घ्या.
- आता कढईत तेल घालून मोहरी, जिरे तड्तडवून घ्या. तेल जरा जास्त घ्यावे.
- त्यात आलं लसूणाची पेस्ट, आणि एक कांदा लाल होईपर्यंत परता.
- आत त्यात एक चमचा वऱ्हाडी मसाला, लाल तिखट, हळद, धने पावडर घाला.
- आता टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत शिजवा.
- आता त्यात चणे घालून परता.सर्व मसाला आणि चणे एकजीव झाल्यावर त्यात पाणी घालून तर्रीला उकळी घ्या.
- तर्रीचा रस्सा पातळ ठेवावा. ही तर्री तिखटच असते.
पोह्यांची कृती :
- पोहे चाळणीत भिजवून घ्या.
- कढईत तेल तापवून त्यात मोहरी घालून तडतडवून घ्या.
- आता चिरलेल्या मिरचीचे तुकडे टाका.
- उरलेला कांदा आणि बटाट्याचे तुकडे घाला.
- आता त्याच फोडणीत साखर, मीठ आणि हळद घाला.
- आणि एक सणसणीत वाफ द्या जेणेकरून बटाटे शिजतील.
- आता पोहे घालून एकजीव करून पुन्हा एक वाफ घ्या.
तर्री पोहे असे करा सर्व्ह :
- खोलगट डिशमध्ये पोहे घ्या. त्यावर तर्रीचा रस्सा टाका,
- सजावटीसाठी वर भरपूर कोथिंबीर, तळलले शेंगदाणे आणि आवडीनुसार शेव टाका.
- आवडत असेल तर त्यावर लिंबू पिळा.