आचारसंहितेमुळे रखडली मेट्रोची मान्यता
By admin | Published: October 25, 2016 06:31 AM2016-10-25T06:31:54+5:302016-10-25T06:31:54+5:30
संपूर्ण जिल्ह्याला विधान परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचा फटका बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पालाही बसला आहे. मेट्रोला नुकतीच सार्वजनिक
पुणे : संपूर्ण जिल्ह्याला विधान परिषद व नगर परिषदांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याचा फटका बहुप्रतीक्षित मेट्रो प्रकल्पालाही बसला आहे. मेट्रोला नुकतीच सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची (पीआयबी) मान्यता मिळाली असली तरी आचारसंहिता संपेपर्यंत त्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत आणखी एक दीड महिना मेट्रोला अंतिम मान्यता मिळण्यास विलंब होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता २२ नोव्हेंबरपर्यंत, तर नगर परिषदांची आचारसंहिता १५ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. नगर परिषदांची आचारसंहिता शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे २२ नोव्हेंबरनंतर मेट्रोच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला जाण्याची शक्यता आहे.
(प्रतिनिधी)
महापालिका निवडणुकीपूर्वी मेट्रोचे भूमिपूजन करण्याचे जोरदार प्रयत्न राज्य व केंद्र सरकारकडून सुरू आहेत. त्यामुळे आचारसंहिता संपताच वेगाने सूत्रे हलवून मेट्रोला मान्यता द्यावी लागणार आहे. महापालिका निवडणुकांमध्ये मेट्रोचे श्रेय घेण्यावरून भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे, त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी मेट्रोचे भूमिपूजन निश्चित मानले जात आहे.