ग्रामविकास अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाईची शिफारस
By admin | Published: March 19, 2017 03:48 AM2017-03-19T03:48:45+5:302017-03-19T03:48:45+5:30
सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आलेली पोस्ट अन्य गु्रपवर पाठविल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब एच.
बारामती : सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात आलेली पोस्ट अन्य गु्रपवर पाठविल्याने बारामती तालुक्यातील काटेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब एच. भोईटे यांना चांगलेच अंगलट आले आहे. या आक्षेपार्ह पोस्टबाबत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रार केल्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.
‘फक्त आणि फक्त कॉमेडी’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आलेली पोस्ट ग्रामविकास अधिकारी भोईटे यांना अडचणीची ठरली आहे. या तक्रारीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनीदेखील बारामती पंचायत समितीमध्ये येऊन माहिती घेतली होती. याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर मासाळ, भाजपाचे मुकेश वाघेला, संतोष कांबळे, नानासाहेब भगत, महेश शिंदे आणि पोपटराव खैरे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर भोईटे यांना नोटीस पाठविण्यात आली होती. तक्रारीवर खुलासा मागवण्यात आला. त्यांनी ‘फक्त आणि फक्त कॉमेडी’ या ग्रुपवरून आलेली पोस्ट मुलांकडून दुसऱ्या गु्रपवर पाठवली गेली, असा खुलासा केला. मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या संदर्भात ही पोस्ट करण्यात आली होती. त्यावर भोईटे यांनी चुकून पोस्ट झाल्याचा मेसेज पाठवला; परंतु या मेसेजमधील वाक्यरचना निंदनीय स्वरूपाची आहे. (प्रतिनिधी)
- भ्रमणध्वनीचा वापर करताना काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा अधिनियम १९६७ मधील ३ चा हा भंग आहे. या अधिनियमाच्या कलम ४ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. त्यामुळे सोशल मीडियाच्या कॉमेडी गु्रपच्या पोस्टमुळे ग्रामविकास अधिकारी भोईटे यांना चांगलीच भोवली आहे.